Russian President Vladimir Putin to visit India soon NSA Ajit Doval : अमेरिकेकडून भारतावर आयातशुल्क लादले जात असताना दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे यावर्षी भारत दौरा करणार असल्याची बाब समोर आली आहे, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरूवारी याबद्दल माहिती दिली आहे. ही भेट २०२५ च्या अखेरीस होण्याची शक्यता असल्याचे वृत्त रॉयटर्सने रशियातील इंटरफॅक्स वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिले आहे. अजित डोवाल हे सध्या रशियात आहेत. भारत व रशिया दरम्यान संरक्षण भागीदारी वाढविण्यासाठी डोवाल हे रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत.

भारत व अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापार संबंधित वाटाघाटी दरम्यान पुतिन यांचा भारत दौरा महत्वाचा ठरू शकतो. काल (बुधवारी) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध जोपर्यंत रशियाकडून थांबवले जात नाही, तोपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना आणखी परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

“आम्ही अध्यक्ष पुतिन य़ांच्या भारत भेटीबाबत ऐकून उत्साहित आणि आनंदी झालो आहोत. मला वाटते की तारखा देखील जवळपास निश्चित झाल्या आहेत,” असे डोभाल म्हणाले.

तुम्ही अगदी योग्य सांगितले की आपल्यात एक अतिशय खास नाते आहे, दीर्घ संबंध आहेत आणि आम्ही आमच्या धोरणात्मक भागीदारीला खूप महत्व देतो. आपल्यात उच्चस्तरीय संबंध राहिले आहेत आणि या उच्चस्तरीय संबंधांनी खूप मोठे योगदान दिले आहे. पुतिन यांच्या भारत दौऱ्याबद्दल समजल्यानंतर आम्ही खूप उत्साही आणि आनंदी झालो आहोत. मला वाटते की सध्या तारखा जवळपास निश्चित झाल्या आहेत,” असे ते म्हणाले.

यापूर्वी रशियाने भारतावर टॅरिफ लादण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका केली होती. रशियाने भारताला पाठिंबा देत देशासा त्यांचे व्यापारी भागीदार निवडण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते.

पुतिन भारत दौऱ्यावर

रशिया व युक्रेनमध्ये २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी व व्लादिमिर पुतिन यांची दोनदा भेट झाली होती. जुलै २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व्या भारत-रशिया परिषदेसाठी मॉस्कोला गेले होते, तिथे त्यांनी पुतिन यांची भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींना रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारत व रशियातील संबंध दृढ होण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘द ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल’ हा रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला होता. त्यानंतर मागील वर्षीच ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान मोदी व पुतिन यांची रशियातील कझान येथे BRICKs परिषदेत भेट झाली होती.

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे लवकरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. रशियाचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी या प्रस्तावित भेटीला दुजोरा दिला आहे. भेटीचे स्थान निश्चित झाल्यानंतर लवकरच या भेटीबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.