हैदराबाद : रशियाची ‘स्पुटनिक-५’ ही करोना प्रतिबंधक लस भारतात आली असून ‘डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज’ या कंपनीला या लशीच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या ‘डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी’ करणार आहे.

समाजमाध्यमांवर याबाबत चित्रफीत प्रसारित करण्यात आली असून त्यात ‘स्पुटनिक -५’असे ठळक अक्षरात लिहिलेल्या कुप्यांची खोकी  एका लहान ट्रकमधून खाली उतरवली जात असताना दिसत आहेत. ‘दी न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने म्हटले आहे,की ‘डॉ. रेड्डीज’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतात स्पुटनिक ५ लस दाखल झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. रशियाच्या ‘गेमालेया नॅशनल रीसर्च इन्स्टिटयूट’ या संस्थेची ही लस ९२ टक्के प्रभावी ठरल्याचा दावा आहे.

ऑस्ट्रेलियाची लस २०२१च्या तिसऱ्या तिमाहीत

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाने कोविड प्रतिबंधक लस विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ही लस २०२१च्या तिसऱ्या तिमाहीत देशातील लोकांना उपलब्ध होईल, असे मत ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी म्हटले आहे.