दिल्लीतील सरोजिनी नगर मार्केटमध्ये एका रशियन महिला युट्युबरचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी सरोजिनी नगर मार्केट परिसरात व्हिडीओ ब्लॉग शूट करत होती. यावेळी एका तरुणाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लील शेरेबाजी केली. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पीडित रशियन तरुणी युट्यूबवर ‘कोको इन इंडिया’ या नावाने प्रसिद्ध आहे. ती दिल्लीच्या सरोजिनी नगर मार्केटमध्ये व्लॉगिंग करत असताना एका अज्ञात तरुणाने तिचा विनयभंग केला. त्याने पीडित महिलेशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. तिने नकार दिल्यानंतरही त्याने काही अंतर तिचा पाठलाग केला. तसेच “तू खूप सेक्सी आहेस” अशी अश्लील शेरेबाजीही केली. हा संपूर्ण प्रकार रशियन तरुणीने शूट केला असून याचा व्हिडीओ स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित केला आहे.

हेही वाचा- भटक्या श्वानांना जेवण देताना अश्लील शेरेबाजी, जाब विचारल्यावर महिलेला मारहाण अन्…; बोरिवलीत धक्कादायक घटना

संबंधित व्हिडीओत पीडित रशियन युवती एक व्हिडीओ ब्लॉग शूट करताना दिसत आहे. यावेळी एक तरुण तिथे आला आणि त्याने “माझी मैत्रीण बनशील का?” अशी विचारणा केली. यावर पीडितेनं “मी तुला ओळखत नाही, मी तुझ्याशी मैत्री कशी काय करू शकते?” असा प्रतिसाद दिला. त्यानंतर “आपली मैत्री झाली तर आपली ओळखही होईल,” असं तरुणाने म्हटलं. यावर पीडित तरुणीने त्याच्याशी मैत्री करायला पूर्ण नकार दिला. तसेच मला खूप सारे मित्र आहेत, मला आणखी मित्र नकोत, असं तिने तरुणाला सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरीही आरोपी तरुणाने पीडितेचा पाठलाग केला आणि “रशियन महिलेशी मैत्री करणं, हे माझं स्वप्न आहे” असं तरुण म्हणाला. रशियन महिलेशी मैत्री करण्याचं तुझं स्वप्न का आहे? तुला भारतीय महिलेशी मैत्री का करायची नाही? असा प्रश्न पीडितेनं विचारला. यावर मला भारतीय महिलांचा कंटाळा आलाय, असं उत्तर आरोपीनं दिलं. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. तर आरोपी तरुणाने पीडितेला “तू खूप सेक्सी आहेस” अशी अश्लील शेरेबाजी केली.