भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान अमेरिकेने मध्यस्ती केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. हा दावा भारताने सातत्याने फेटाळून लावला असला तरीही हा वाद आता पुन्हा एकदा उफाळून येत आहे. भारत-पाकिस्तानातील तणावादरम्यान अमेरिकेने मदत केल्याने जगाने अमेरिकेचे आभार मानायला हवेत का? असा प्रश्न भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विचारण्यात आला. त्यावर एस. जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. जर्मन वृत्तपत्र फ्रँकफर्टर ऑलगेमाइन झीटुंगला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
भारत-पाकिस्तानातील शस्त्रविरामानंतर जगाने अमेरिकेचे आभार मानले पाहिजेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “दोन्ही बाजूंच्या लष्करी कमांडर्समध्ये थेट संपर्काद्वारे गोळीबार थांबवण्यावर सहमती झाली होती. आदल्या दिवशी सकाळी, आम्ही पाकिस्तानच्या मुख्य हवाई तळांवर आणि हवाई संरक्षण यंत्रणेवर प्रभावीपणे हल्ला केला आणि त्यांना अक्षम केले. तर, शत्रुत्व थांबवल्याबद्दल मी कोणाचे आभार मानावे? मी भारतीय लष्कराचे आभार मानतो कारण भारतीय लष्कराच्या कारवाईमुळेच पाकिस्तान शस्त्रविरामास भाग पाडण्यात आले.
१० मे रोजी भारत आणि पाकिस्तानने तीन दिवसांच्या सीमेपलीकडून झालेल्या संघर्षानंतर शस्त्रविरामावर सहमती दर्शवली. ७ मे रोजी भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर हवाई हल्ले केले. यामध्ये २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. भारताने यावर भर दिला की ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने होते, परंतु पाकिस्तानने भारताच्या लष्करी प्रतिष्ठानांवर आणि नागरी भागांवर शेकडो ड्रोन डागून हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या भारतीय समकक्षांशी संपर्क साधला आणि शस्त्रविरामावर सहमती झाली.
पाकिस्तानला आमच्याशी संपर्क करावा लागेल
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रविरामाचे श्रेय घेतले. यावरून अमेरिका आणि भारतात वाद सुरू झाला आहे. एका मुलाखतीत एस. जयशंक म्हणाले होते, आम्ही आमच्याशी बोलण्याऱ्या प्रत्येकाला फक्त अमेरिकाच नाही तर सर्वांना एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे की जर पाकिस्तानला लढाई थांबवायची असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. त्यांच्या लष्करी जनरल अधिकाऱ्याला आमच्या लष्कराशी संपर्क करावा लागेल आणि तसंच घडलंय.”
दोन आठवड्यांपासून परिस्थिती बदललेली नाही
शस्त्रविरामामुळे संघर्षापूर्वीची परिस्थिती पूर्ववत झाली आहे का असे विचारले असता, डॉ. जयशंकर म्हणाले, “आम्ही दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की एप्रिलमध्ये काश्मीरमध्ये आमच्यावर जसे हल्ले केले होते तसे असे हल्ले करण्यासाठी त्यांना किंमत मोजावी लागेल. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला. आम्ही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिले आणि एकदा पाकिस्तानींना समजले की ते हानिकारक मार्गाने जात आहेत, तेव्हा आम्ही गोळीबार थांबवू शकलो. ही परिस्थिती दोन आठवड्यांपासून बदललेली नाही, तीच स्थिती आहे.”