पीटीआय, नवी दिल्ली

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तातडीने सुधारणा न झाल्यामुळे या संस्थेच्या कामाचा खोळंबा झाला आहे, असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या दहशतवादी संघटनेला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अभय देण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. संयुक्त राष्ट्रांच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जयशंकर बोलत होते.

जागतिक रणनीतीच्या नावाखाली दहशतवादाचे पीडित आणि दहशतवादाचे सूत्रधार यांची तुलना करणाऱ्यांवरही जयशंकर यांनी टीका केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी भारत आणि पाकिस्तानचा उल्लेख एकत्र केला होता, त्याबद्दल परराष्ट्रमंत्र्यानी कोणाचेही नाव न घेता नाराजी व्यक्त केली. “स्वयंघोषित दहशतवाद्यांना निर्बंधांच्या प्रक्रियेपासून संरक्षण मिळते, तेव्हा त्यात सहभागी असलेल्यांच्या गांभीर्याबद्दल काय बोलणार,” असे जयशंकर म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्व काही आलबेल नाही, कारण तेथील चर्चांचे आता वाढत्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले आहे आणि या संस्थेच्या कामकाजाची कोंडी होताना दिसत आहे, अशी चिंता जयशंकर यांनी बोलून दाखवली. सुधारणा प्रक्रियेचा वापर करूनच कोणत्याही अर्थपूर्ण सुधारणेत अडथळा आणला जात आहे, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांची फेरउभारणी हे जगासमोरील मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांसमोरील आव्हानांबद्दल बोलताना काही उदाहरणे बोलकी आहेत. जेव्हा सुरक्षा परिषदेचा सदस्य पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारख्या क्रूर कृत्याची जबाबदारी घेणाऱ्या संघटनेचे उघडपणे संरक्षण करतो, तेव्हा बहुपक्षवादाच्या विश्वसनीयतेवर त्याचा काय परिणाम होतो?- एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री