पीटीआय, तियानजिन

चीनच्या तियानजिन शहरात सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानचा विसंवाद दिसून आला. ‘एससीओ’ने दहशतवादाचा सामना करण्याच्या मुद्द्यावर तडजोड न करण्याची भूमिका घेतली पाहिजे असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी बजावले. तर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचा दावा केला. त्याचवेळी यजमान देशाचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सुरक्षेच्या दृष्टीने ‘एससीओ’ला अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेल्या उत्तराचे जोरदार समर्थन केले. ‘‘पहलगाम हल्ला जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाचे नुकसान करण्यासाठी आणि धार्मिक दुही माजवण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आला होता,’’ असे जयशंकर यांनी ठामपणे सांगितले. दहशतवादी हल्ल्यांना प्रतिसाद देताना भारत ठाम राहील असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री दार यांनी आपल्याला भारतासह सर्व देशांबरोबर शांतता आणि स्थैर्याचे संबंध हवे आहेत असा दावा केला. वाद आणि मतभेदांचे निवारण संघर्ष आणि सक्तीच्या माध्यमातून नव्हे तर चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून करता येते असे ते म्हणाले. ‘‘विश्वसनीय तपास न करता किंवा पडताळणी करता येण्याजोग्या पुराव्यांविना पहलगाम हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानवर टाकण्यात आली. यामुळे दोन आण्विक शक्तींमध्ये मोठा संघर्ष होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती,’’ असा दावाही त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनचा गटमजबुतीवर भर

एससीओने सुरक्षेला असलेले धोके आणि आव्हानांना प्रत्युत्तर देण्यासाठी असलेल्या यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे असे क्षी जिनपिंग यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमधील आव्हाने आणि अस्थैर्य पाहता ‘एससीओ’ने पाय रोवून आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे आणि सक्रिय, परिणामकारक पावले टाकली पाहिजेत, असे ते म्हणाले.