S. Jaishankar on India Russia Trade : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे तीन दिवसांसाठी रशिया दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, बुधवारी (२० ऑगस्ट) त्यांनी रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंद्रोव्ह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जयशंकर मंद्रोव्ह यांना म्हणाले, “आपण व्यापार व गुंतवणूक संबंधांचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे.” जयशंकर हे गुरुवारी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेइ लाव्हरोव यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी रशियातील अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की “सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उभय देश विशेष यंत्रणा विकसित करतील.”

अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केलं असून आणखी २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी अमेरिका भारतावर दबाव निर्माण करू पाहतेय. मात्र, भारताने अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाबरोबरचा व्यापार चालू ठेवला आहे. दरम्यान, एस. जयशंकर मॉस्कोमध्ये (रशियाची राजधानी) रशियन नेते व अधिकाऱ्यांना म्हणाले, “आपण एका ठरलेल्या मार्गावर अडकून राहता कामा नये. अधिक काम करणे आणि वेगळ्या पद्धतीने करणे हाच आपला मंत्र असला पाहिजे.”

“भारत व रशियाने आपल्या द्विपक्षीय व्यापारात विविधता आणली पाहिजे : जयशंकर

टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या आपल्या भाषणात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “भारत व रशियाने आपल्या द्विपक्षीय व्यापारात विविधता आणली पाहिजे. संयुक्त उद्योगांच्या माध्यमातून सहकार्य वाढवलं पाहिजे. यात विविधता आणून उद्योगाच्या विस्तारास आपल्याला खूप वाव आहे. अधिक व वेगळ्या पद्धतीने काम करणं हाच आपला मंत्र असला पाहिजे.” भारत-रशिया आंतर-सरकारी व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक व सांस्कृतिक सहकार्य आयोगाच्या (IRIGC-TC) चौकटीत जयशंकर व मंद्रोव्ह यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सध्याच्या भू-राजकीय उलथापालथीसंदर्भात भारत-रशिया संबंधांच्या मुद्द्यावर प्रकाश टाकत जयशंकर यांनी उभय देशांचे आर्थिक क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “दोन्ही देशांनी परस्पर सल्लामसलत करून आपल्या आजेंड्यांमध्ये सातत्याने विविधता आणली पाहिजे आणि व्यापाराचा विस्तार केला पाहिजे. आपण व्यापार व गुंतवणुकीच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग केला पाहिजे. आपण केवळ एका मार्गावर अडकून राहता कामा नये.” जयशंकर यांनी यावेळी दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी उद्दिष्टे आणि ठराविक वेळमर्यादा निश्चित करण्याचेही आवाहन केले.