‘केदार जाधव ऐवजी रविंद्र जाडेजाला संघात संधी द्यायला हवी’ असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे. रविवारी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. या सामन्याचे विश्लेषण करताना सचिन तेंडुलकरने संथ फलंदाजी करणाऱ्या केदार जाधव ऐवजी रविंद्र जाडेजाला संधी देण्यात यावी असं मत व्यक्त केलं. के. एल. राहुल जखमी झाल्याने मैदानाबाहेर गेल्याने त्याच्या जागी आलेल्या जाडेजाने जेसन रॉयचा भन्नाट झेल पकडत भारताला पहिली विकेट मिळवून दिली.

केदार जाधवबद्दल बोलताना सचिनने त्याच्याऐवजी संघ व्यवस्थापनाने जाडेजाचा विचार करावा असं मत व्यक्त केलं आहे. ‘इंग्लंडची सलामीच्या जोडीने १६० धावांची सलामी दिली. अशावेळी जाडेजासारखा डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज फायद्याचा ठरू शकतो’, असं मत सचिनने व्यक्त केलं आहे. जर जाधव सातव्या क्रमांकावरच खेळणार असेल तर त्या जागेवर जाडेजाही चांगली फलंदाजी करु शकतो. तसेच जाडेजा चांगली गोलंदाजीही करु शकतो असा विश्वास सचिनने व्यक्त केला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताच्या फिरकी गोलंदाजांना लय गवसलीच नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या २ फिरकीपटूंनी मिळून १६० धावा दिल्या. मात्र विराटने सहावा गोलंदाज म्हणून केदार जाधवचा वापर या सामन्यामध्ये केला नाही. अनेकांनी ट्विटवरुन यासंदर्भात नाराजी व्यक्त करताना केवळ फलंदाज म्हणून जाधवला संघात स्थान देण्याऐवजी त्याची जागा घेणारे अनेक चांगले खेळाडू संघाबाहेर असल्याची टिका ट्विटवर अनेकांनी केली.

जाडेजा श्रेत्ररक्षणात पुन्हा चमकला…

दुसरीकडे रविंद्र जाडेजाने भन्नाट झेल घेत जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या सलामीच्या जोडीतील रॉयला तंबूत परत पाठवले. अशाप्रकारे बदली खेळाडू म्हणून जाडेजाने श्रेत्ररक्षणामध्ये चमक दाखवण्याची ही मालिकेतील दुसरी वेळ आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने ग्लेनमॅक्सवेलचा भन्नाट झेल घेतला होता.

धोनी आणि केदार टिकेचे धनी..

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये के. एल. राहुल भोपाळाही न फोडता परतल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट यांनी संयमी खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. मात्र अर्धशतक केल्यानंतर काही वेळात विराट झेलबाद झाल्यानंतर वृषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानंतर शकतवीर रोहित शर्माही तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याने पंतच्या जोडीने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र एकामागे एक दोघे बाद झाले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या धोनी आणि केदार जाधव यांनी मात्र संथ खेळी केली. या दोघांच्या फलंदाजीवर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या दोघांनाही इंग्लंडच्या गोलंदाजीवर मोठे फटकेच मारता आले नाहीत. त्यामुळेच धावांचं आणि चेंडूमधील अंतर वाढत गेलं अन् भारताचा पराभव झाला. ४५ व्या षटकात धोनीबरोबर फलंदाजी करायला केदार जाधव आला त्यावेळी भारताला ३१ चेंडूत ७१ धावांची गरज होती. अशावेळी स्फोटक फलंदाजी न करता दोघांनी एक आणि दोन धावा घेण्यावर भर दिल्याचे दिसले. हे दोघे जिंकण्यासाठी खेळतच नाहीत अशी टिका नेटकऱ्यांनीही ट्विटवरुन केली. भारताचा पराभव झाला तेव्हा पाच विकेट्स बाकी होत्या. बचावात्मक पवित्रा घेऊन आक्रमाक फलंदाजी करत पराभव झाला असता तरी चाललं असतं असं मत अनेकांनी ट्विटरवर व्यक्त केलं. भारताने ५० षटकांमध्ये ३०६ धावांची खेळी केली. भारताचा डाव संपला तेव्हा धोनी आणि केदार जाधव नाबाद राहिले. धोनीने ३१ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४२ तर जाधवने १३ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या.