भाच्यामुळे गोत्यात आलेले रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणि सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रामुळे सर्वोच्च न्यायालयात तोंडघशी पडलेले कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या केंद्र सरकारातील दोन अध्वर्यूमध्ये अनबन निर्माण झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बन्सल आणि अश्वनीकुमार यांच्यामुळे पंतप्रधान आणि काँग्रेस यांच्यातही मतभेद निर्माण झाला आहे.
पवनकुमार बन्सल आणि अश्वनीकुमार हे दोघेही पंतप्रधानांच्या मर्जीतले समजले जातात. त्यामुळे पंतप्रधानांनी या दोघांच्या बचावासाठी मोहीम उघडली आहे. मात्र, काँग्रेसमधील एक घटक पंतप्रधानांच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे समजते. बन्सल आणि कुमार या दोघांनाही मंत्रिपदावर राहण्याचा काहीएक हक्क नसून त्या दोघांनीही तातडीने राजीनामा देणेच पक्षहिताचे ठरेल असे अनेकांचे मत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही पक्षसदस्यांच्या या मताशी सहमत असल्याचे समजते. त्यामुळे या मुद्दय़ावरून उभयतांमध्ये अनबन निर्माण झाली आहे.
अन्नविधेयकावरून गदारोळ
अश्वनीकुमार आणि बन्सल यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून लक्ष उडविण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा विधेयकाला ढाल बनविल्यानंतर सत्ताधारी यूपीएने हे विधेयक संमत करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या तीन दिवसांत दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक संमत करणे अवघड असल्याची भावना काँग्रेसमध्ये आहे.
काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असताना मंगळवारी सोनिया गांधी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या पाठीवर थाप मारली आणि नंतर आिलगन देऊन त्यांचा वैयक्तिक रोष संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला.
सोनिया आणि स्वराज यांनी सेंट्रल हॉलमध्ये काही काळ येरझाऱ्या घालून चर्चा केल्याचेही समजते. त्यामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा विधेयकावरील भाजपने पुकारलेला असहकार बुधवारी संपुष्टात येणार का, असा प्रश्न आहे. हे विधेयक कुठल्याही परिस्थितीत संमत झाले पाहिजे, असे सोनिया गांधी यांना वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र विरोधकांना न जुमानता दोनतृतीयांश मतांची आवश्यकता असलेले हे विधेयक दामटणे सत्ताधारी यूपीएला शक्य नाही. भाजपचे नेते काँग्रेसचे संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांच्याशी संवाद साधायलाही तयार नसल्यामुळे विरोधी पक्ष आणि यूपीए यांच्यात या विधेयकावरून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार शिष्टाई करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2013 रोजी प्रकाशित
पंतप्रधान व सोनिया यांच्यात तणाव ?
भाच्यामुळे गोत्यात आलेले रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणि सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रामुळे सर्वोच्च न्यायालयात तोंडघशी पडलेले कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या केंद्र सरकारातील दोन अध्वर्यूमध्ये अनबन निर्माण झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
First published on: 08-05-2013 at 02:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sacking of ministers pm sonia hold different views