‘माझ्या शापानेच हेमंत करकरे मारले गेले!’

भोपाळ : महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे हे माझ्याच शापामुळे दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असे धक्कादायक विधान मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळमधील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केल्यानंतर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.  त्यानंतर प्रज्ञासिंह यांनी माफी मागत विधान मागे घेतले असले तरी भाजपची राजकीय कोंडी झाली आहे.

भोपाळपासून ४५ किलोमीटरवर असलेल्या बेरासिया या गावी गुरुवारी एका जाहीर सभेत प्रज्ञासिंह यांनी करकरे यांच्याविरोधात अश्लाघ्य टीका केली होती. आजारपणाचे कारण सांगत जामीन मिळवलेल्या प्रज्ञासिंह यांनी भोपाळमधून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरताच प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.

भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत प्रज्ञासिंह यांनी आरोप केला की, ‘‘माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नसताना करकरे यांनी मला सोडले नाही. मी कुठूनही पुरावे उभे करीन पण साध्वीला सोडणार नाही, असे त्यांनी चौकशी आयोगाला सांगितले होते. काही झाले तरी माझी सुटका होऊ द्यायची नाही, असा चंग त्यांनी बांधला होता. हा त्यांचा दुष्टावा होता. हा देशद्रोह आणि धर्मद्रोह होता. ते मला स्फोटावरून अनेक प्रश्न विचारत. मी म्हणत असे, ‘मला माहीत नाही, देवालाच काय ते माहीत असेल.’ त्यावर ते विचारत की, हे जाणून घेण्यासाठी त्यांना देवाला कसं भेटता येईल? मी म्हणत असे की, ‘ते शक्य आहे, पण तुमचा विश्वास नाही त्यामुळे वेळ लागेल.’ तुमचा नाश होईल, असंही मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. तरीही त्यांच्याकडून छळ सुरूच होता. तुमचा सर्वनाश होईल, असं मी चिडून म्हणाले आणि त्यानंतर महिनाभरातच त्यांची हत्या झाली,’’ असे प्रज्ञासिंह यांनी सांगितले. प्रज्ञासिंह यांचा बेतालपणा एवढय़ावरच थांबला नाही, त्या पुढे असेही म्हणाल्या की, साधूसंन्याशांचा असाच शाप लागल्याने रावणाचा आणि कंसाचाही अंत ओढवला होता!

प्रज्ञासिंह यांच्या या विधानानंतर मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली. त्यावरून आयोगाने चौकशी सुरू करताच आणि समाजमाध्यमांवरूनही जनक्षोभ उसळू लागताच भाजपनेही ‘करकरे हे शहीदच असून ठाकूर यांचे विधान व्यक्तिगत आहे,’ असा बचावात्मक पवित्रा घेतला. पण जनक्षोभाची तीव्रता वाढू लागताच प्रज्ञासिंह यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करून वाद आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

माझ्या विधानानं देशाच्या शत्रूंचे फावेल, ही शक्यता लक्षात आल्याने मी माझे विधान मागे घेत आहे आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते.  माझ्या व्यक्तिगत वेदनेतून मी ते बोलले. पण करकरे हे शत्रूराष्ट्राच्या अतिरेक्यांच्या गोळ्यांनाच बळी पडले आणि त्यामुळे ते शहीदच आहेत, असे प्रज्ञासिंह यांनी शुक्रवारी रात्री उशीरा सांगितले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ‘‘भाजप उमेदवाराने पातळी आणि सर्व मर्यादा सोडून जी टीका केली आहे ती अतिशय धक्कादायक आहे. देशासाठी प्राण देणाऱ्या एका हुतात्म्याला रावणाची उपमा देणे संतापजनक आहे. हुतात्म्याला देशद्रोही म्हणण्यापर्यंत भाजप नेत्यांची मजल गेली आहे. त्याबद्दल मोदी यांनीच देशाची माफी मागावी.’’

भोपाळमधून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, ‘‘हेमंत करकरे हे समर्पित वृत्तीचे अधिकारी होते. त्यांनी देशासाठी प्राणार्पण केले आहे. कोणीही अशी वक्तव्ये करू नयेत.’’दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘‘या उद्गारांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. भाजप आता आपले खरे रंग दाखवत असून त्यांना त्यांची खरी जागा दाखवलीच पाहिजे.’’

ट्विटरवरूनही टीका

२६/११च्या हल्ल्यावरून पाकिस्तानच्या कोंडीचा भारताचा प्रयत्न पूर्णत्वास गेला नसतानाच करकरे यांच्या मृत्यूस अतिरेकी नव्हे, तर आपला शाप कारणीभूत असल्याचे भाजपचाच उमेदवार म्हणत असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले हसे झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ट्विपण्णी  करण्यात आली आहे. भाजपला योगी आदित्यनाथांचा वारसदार मिळाला, असा टोलाही हाणण्यात आला. शोभा डे यांनी सवाल केला की, यांना कशाच्या आधारावर साध्वी म्हणावे?

पोलीस संघटनेकडून निषेध

भारतीय पोलीस अधिकारी संघटनेने भाजप उमेदवार प्रज्ञासिंह यांच्या या उद्गारांचा तीव्र निषेध केला आहे. ‘‘अशोकचक्राने सन्मानित झालेले करकरे यांनी अतिरेक्यांशी लढताना देशासाठी सर्वोच्च बलिदान केले आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराच्या या अपमानजनक वक्तव्याचे आम्ही सर्व गणवेषधारी पोलीस निषेध करीत आहोत आणि देशाने आपल्या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानाची बूज राखावी, असे आवाहन करीत आहोत,’’ असे संघटनेने म्हटले आहे.

आधी..

माझी सुटका होऊ न देण्याचा चंग करकरे यांनी बांधला होता. हा त्यांचा देशद्रोह आणि धर्मद्रोह होता. त्यांच्याकडून माझा छळ सुरूच होता. तुमचा सर्वनाश होईल, असं मी म्हणाले आणि नंतर महिनाभरातच त्यांची हत्या झाली. संतांचे असेच शाप रावणाला आणि कंसाला भोवले होते.

नंतर..

माझ्या विधानानं देशाच्या शत्रूंचे फावेल, हे लक्षात आल्याने मी माझे विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त करते.  करकरे हे शत्रूराष्ट्राच्या अतिरेक्यांच्या गोळ्यांनाच बळी पडले आणि त्यामुळे ते शहीदच आहेत.