राजधानीतील प्राध्यापकाने एका अनोळखी व्यक्तीला आपली किडनी दान करुन मानवतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. प्राध्यापकाच्या या कृत्याची चर्चा सर्वत्र होत आहे. काही लोकांच्या दातृत्वाला धर्म, पंथ, भाषा आणि प्रांताची सीमा नसते हेच त्यांच्या या वागण्यामुळे सिद्ध झाले.
दिल्लीतील जामिया हमदर्द विद्यापीठामध्ये व्यवस्थापन शिकविण्याऱ्या साखी जॉन यांनी आपले मूत्रपिंड केरळच्या शाजू पॉल यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. शाजू पॉल हे केरळमध्ये पीची येथे बस क्लिनरचे काम करतात. उल्लेखनीय बाब म्हणजे शाजू आणि साखी हे दोघे एकमेकांना ओळखत देखील नव्हते. जेव्हा शाजू यांची किडनी निकामी झाली तेव्हा त्यांच्यासाठी दात्याचा शोध सुरू झाला.
एका स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत साखी यांचा शोध लागला. त्यांनी किडनी दान करण्याची तयारी दर्शवली. त्यांची आणि शाजू यांची किडनी ९५ टक्के जुळली. त्यानंतर डॉक्टरांनी निर्णय दिला की साखी यांची किडनी शाजूंना बसविल्यास चालेल. त्यानंतर त्यांची प्रथम भेट झाली.
माझ्या काळोख्या आयुष्यात तुम्ही आशेचा किरण आहात असे वाक्य शाजू यांनी साखी यांना पहिल्या भेटीत म्हटले होते. आपण दोघे एका धर्माचे बांधव आहोत. मानवताच हा खरा धर्म असल्याचे साखी यांनी शाजू यांना म्हटल्यावर शाजू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
शाजू हे अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. ते बस स्वच्छतेचे काम करतात तसेच त्यांच्याकडे दोन गायी आहेत त्यांचे ते दूध विकतात. त्यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुमची किडनी निकामी झाली आहे तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
शाजू यांच्या गावाकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी २२ लाख रुपये जमा करण्याचे आव्हान हाती घेतले. परंतु मुख्य प्रश्न होता किडनी दात्याचा. ख्रिश्चन धर्मगुरू डेविड कॅरामल यांची किडनी फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. आतापर्यंत संस्थेच्या मार्फत ५९ गरजू व्यक्तींना किडनी पुरविण्याचे काम करण्यात आले आहे. डेविड हे देखील किडनी दाता आहे.
साखी आणि डेविड यांची भेट २०१५ मध्ये झाली. ते किडनी दान करण्यासाठी इच्छुक होते. योग्य व्यक्ती मिळाल्यावर आपली किडनी दान करण्याची त्यांची इच्छा होती. व्यक्ती गरीब कुटुंबातील असली पाहिेजे अशी त्यांची अट होती. जेव्हा डेव्हिड यांनी शाजूबद्दल सांगितले त्यानंतर साखी यांनी किडनी देण्याची तयारी दर्शवली.
साखी यांना सुमारे साडेतीनशेहून अधिक वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागले. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे कागदपत्रांची पूर्तता. शाजू यांना लिहिता वाचता येत नसल्यामुळे स्वतः साखी यांनी ही कामे केली. आपल्या कामाच्या वेळा सांभाळून साखींनी ही जबाबदारी पार पाडली. केवळ कागदपत्रे पूर्ण नाहीत म्हणून मला नाकरण्यात आले असे होऊ नये म्हणून मी ही खबरदारी घेतल्याचे साखी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
२१ डिसेंबर रोजी शाजू यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. साखी यांच्या रुपाने आपणास देवदूतच भेटल्याचे शाजू यांनी म्हटले.