सलमान खान व कतरिना कैफ यांचा ‘भारत’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घौडदौड सुरु आहे. इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय संघानेही सलमानचा हा सिनेमा पाहिला. भारतीय संघाचा सदस्य असणाऱ्या केदार जाधवने हा सिनेमा पाहून सिनेमागृहाबाहेर आल्यानंतर एक खास फोटो सलमानला ट्विट करुन पोस्ट केला होता. या ट्विटला सलमानने उत्तर देत सिनेमा पाहण्यासाठी भारतीय खेळाडूंचे आभार मानले असून संपूर्ण भारत तुमच्या सोबत असल्याचे म्हटले आहे.

सलमानच्या भारक सिनेमाने मागील सात दिवसांमध्ये भरघोस कमाई केली. मागील सहा दिवसांमध्ये ‘भारत’ने ४२.३० कोटी (बुधवार), ३१ कोटी (गुरुवार), २२.२० कोटी (शुक्रवार), २६.७० कोटी (शनिवार), २७.९० कोटी (रविवार) व ९.२० कोटी (सोमवारी) इतकी कमाई केली आहे. सिनेमाच्या यशबद्दल सलमानने चाहत्यांचे ट्विटवरुन आभार मानले. सलमानचा सिनेमा पाहणाऱ्यांमध्ये भारतीय संघातील खेळाडूंचाही समावेश होता. केदार जाधवने सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर काढलेला एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये हार्दिक पांड्या, एम. एस. धोनी, शिखर धवन, के. एल. राहुल हे खेळाडू दिसत आहेत. ‘भारत की टीम भारत मुव्ही के बाद’, असे कॅप्शन केदारने या फोटोला दिले आहे.

हे ट्विट सलमानने कोट करुन रिट्विट केले असून सिनेमा पाहिल्याबद्दल भारतीय खेळाडूंचे आभार मानले आहे. सलमान आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ‘भारत आवडल्याबद्दल भारतीय संघाचे धन्यवाद. इंग्लंडमध्ये भारत सिनेमा पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. पुढील समान्यांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण भारत तुमच्या सोबत आहे.’

सलमानने दिलेल्या शुभेच्छांसाठी केदारनेही ट्विट करुन धन्यवाद म्हटले आहे.

दरम्यान भारताने विश्वचषक स्पर्धेमधील पहिले दोन्ही सामने जिंकले असून उद्या भारताचा समाना न्यूझीलंडसोबत आहे.