अ.भा. मुस्लीम वैयक्तिक कायदे मंडळात (एआयएमपीएलबी) फूट पाडण्यासाठी मौलाना सलमान हुसेनी नडवी हे पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असा आरोप एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींनी केला आहे. बाबरी मशिदीची जमीन सोडण्याची मागणी करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकावा, असे आवाहन करत काही लोक मोदींच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे त्यांनी म्हटले. नडवी यांना अयोध्येत बाबरी मशीदची जमीन राम मंदिरच्या निर्मितीसाठी सोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे त्यांना मंडळामधून हटवण्यात आले होते. ओवेसींनी मंडळाची तीन दिवसीय बैठकीनंतर बोलताना नडवी यांच्यावर टीका करत बाबरी मशिदीबाबत कोणतीच तडजोड केली जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
‘मशीद इतरत्र हलवली जाऊ शकते’, ही भूमिका भोवली!
नडवी यांनी शुक्रवारी सुरू झालेल्या मंडळाच्या २६ व्या पूर्ण बैठकीच्या पूर्वसंध्येस बेंगळुरू येथे श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली होती. सहा डिसेंबर १९९२पर्यंत ज्या जमिनीवर बाबरी मशीद उभी होती. ती जमीन राम मंदिर उभारण्यासाठी सोडली पाहिजे आणि दुसऱ्या ठिकाणी मशिदीची उभारली जावी, असा प्रस्ताव त्यांनी या बैठकीत मांडला होता. यावर ओवेसी म्हणाले की, ते (नडवी) म्हणतात की, त्यांच्या प्रस्तावामुळे देशात शांतता आणि एकता प्रस्थापित होईल. मग आम्ही अरेबियामध्ये एकतेच्या नावाखाली मस्जिद-ए-अक्साला (जेरूसलेम येथे अल-अक्सा मस्जिद) सोडावे काय, असा सवाल उपस्थित केला.
मशीद हे ‘अल्लाचे घर’ आहे. ती नेहमी तशीच राहील. ती हलवली किंवा विकली जाऊ शकत नाही, असा २००१ मध्ये फतवा काढून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या मौलवींपैकी नडवी हे एक मौलवी होते, अशी माहिती ओवेसींनी दिली.