प्रेमात पडलं की माणूस सारं काही विसरतो असं म्हणतात. अशीच काहीशी घटना आता समोर आली आहे. मुलांचं लग्न होण्याआधीच व्याही आणि विहीणबाई एकमेकांच्या प्रेमात पडल्याने घरातून पसार झाले आहेत. मुलांच्या लग्नाआधी वर पिता आणि वधूची आई दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि या मुलाचं आणि मुलीचं लग्न लागण्याआधीच या दोघांनी पळ काढला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात प्रचंड भावनिक वादळ आणि उलथापालथ निर्माण झाली आहे. वधूच्या वडिलांनी या प्रकरणात वर पित्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे.
नेमकी कुठे आणि काय घडली घटना?
चक्रावून टाकणारं हे प्रकरण उत्तर प्रदेशातल्या कासगंजमधल्या डुंडवारा भागात घडलं आहे. या गावात पप्पूच्या मुलीचं लग्न शकीलच्या मुलीशी जमलं होतं. शकीलचं त्यामुळे पप्पूच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. लग्नाची तारीखही जवळ आली होती त्यामुळे तयारीही सुरु होती. याच दरम्यान शकील त्याच्या होणाऱ्या सुनेच्या आईला घेऊन पळून गेला आहे. पप्पूने या प्रकरणी शकीलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शकीलने माझ्या पत्नीला नादाला लावलं आहे आणि तिचं अपहरण केलं आहे असा आरोप पप्पूने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
हे पण वाचा- विवाहित महिलेसह तरुणाचं पलायन, गावकऱ्यांनी दिली ‘ही’ शिक्षा; घटनेचा VIDEO व्हायरल
पप्पूने शकीलविरोधात केली तक्रार
पप्पू आणि शकील हे एकमेकांचे व्याही होणार होते. मात्र त्याआधीच शकील विहीणबाईंना घेऊन पसार झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शकीलला १० मुलं आहेत, तर त्याच्या विहिणीला सहा मुलं आहेत. दोघंही घरातून फरार आहेत. पीडित पप्पूने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. व्याही आणि विहीण यांच्या प्रेमाचं अजब प्रकरण समोर आल्याने पोलीसही चक्रावले आहेत. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी काय म्हटलं आहे?
पप्पूची पत्नी गायब झाल्याने त्याने शकीलवर अपहरणाचा आरोप केला आहे. माझ्या मुलीचा विवाह शकीलच्या मुलाशी होणार होता. त्याचं घरी येणं-जाणं होतं. त्यावेळी त्याने माझ्या पत्नीला नादाला लावलं आणि तो तिला घेऊन पळाला. माझ्या पत्नीचा अद्याप काहीही पत्ता लागलेला नाही. डुंडवारा पोलीस ठाण्याचे सीओ विजय कुमार यांनी सांगितलं की ८ जूनला पप्पूने या प्रकरणाची तक्रार दिली आहे. त्याची पत्नी बेपत्ता आहे. यानंतर ही महिला बेपत्ता झाल्याची नोंद आम्ही केली आहे. ११ जुलैला पप्पूने पुन्हा एकदा विनंती पत्र दिलं आहे. गणेशपूरचा निवासी शकील हा त्या प्रकरणात आरोपी आहे. त्याने पप्पूच्या पत्नीला पळवून नेलं आहे. या प्रकरणात आमची कारवाई सुरु आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.