प्रेम आणि आकर्षण हे कोणत्याही वयात होऊ शकतं असं म्हटलं जातं, ही गोष्ट कुणाबरोबरही होऊ शकते. यानंतर लग्न हे विश्वासावर टिकलेलं नातं असतं. प्रेम, माया, ओढ हे सगळं महत्त्वाचं असलं तरी लग्नात एकमेकांच्या जोडीदारावर विश्वासच नसेल तर ते नातं पोकळ ठरतं आणि आयुष्य उदध्वस्त होऊ शकतं. अशीच एक विश्वासघाताची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. यात एका तरुणाने गावातील विवाहित महिलेसह लग्न केले यानंतर अनेक दिवस ते हिमाचल प्रदेशात राहिले, पण गावकऱ्यांनी त्याला आपल्या जाळ्यात अडकवत त्याची गावभर धिंड काढली. यावेळी त्याला अशी काही शिक्षा दिली जी त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिल. पण या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.
उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यात एकाच गावातील एक तरुण विवाहित महिलेच्या प्रेमात पडला, यानंतर तो तिच्याशी लग्न करून पळून गेला. तिच्याशी लग्न करून तो जेव्हा पुन्हा गावात आला, तेव्हा त्याला गावकऱ्यांनी अतिशय अमानुष शिक्षा दिली. गावातील लोकांनी तरुणाला दिलेली शिक्षा पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हे संपूर्ण प्रकरण बदाऊनमधील फैजगंज बेहता भागातील एका गावातील आहे. येथे लोकांनी गावातील विवाहित महिलेशी प्रेमसंबंध ठेवल्याबद्दल एका मुलाला बूट आणि चप्पलांचा हार घातला. यानंतर तोंडाला काळे फासत त्याची गावभर धिंड काढली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एवढेच नाही तर गावातील लोकांनी त्याला विष्ठा खाऊ घातली आणि लघवीही पाजली, असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी या गावातील एका विवाहित महिलेचे अपहरण करून हिमाचल प्रदेशात जाऊन त्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप या तरुणावर आहे. लग्नानंतर दोघेही गावी परतले, तेव्हा गावकऱ्यांनी मुलाला गंभीर शिक्षा दिली.
पीडित तरुणाने पोलिसांत केली तक्रार
पीडित तरुण आणि गावातील विवाहित महिला हिमाचलमध्ये लग्न करून तिथेच राहत होते, मात्र गावकऱ्यांनी कोणत्यातरी बहाण्याने तरुणाला परत बोलावले. त्यानंतर तरुण त्या महिलेसह गावात पोहोचताच त्याची गावकऱ्यांनी चांगलीच धुलाई केली. मात्र, या घटनेनंतर पीडित तरुणाने गावकऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनीही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.