भारतीय जनता पक्षाच्या ‘संपर्क फॉर समर्थन’उपक्रमांतर्गत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांची भेटी घेतली. यावेळी गेल्या चार वर्षांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी धोनीसमोर मांडला आणि सोबत सरकारने केलेल्या कामांची माहिती असलेली एक पुस्तिकाही भेट दिली. यावेळी शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते.


या भेटीनंतर अमित शाह यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. ‘संपर्क फॉर समर्थन’उपक्रमांतर्गत जागतिक क्रिकेटमधल्या सर्वोत्कृष्ट फिनिशरची आज भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी गेल्या चार वर्षांमध्ये राबवलेल्या उपक्रमांबाबत त्यांना माहिती दिली. असं ट्विट अमित शाह यांनी केलं.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘संपर्क फॉर समर्थन’ हा उपक्रम सुरु केला असून या अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीची भेट घेऊन सरकारने केलेल्या कामकाजाची माहिती दिली जात आहे. यापूर्वी अमित शाह यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित , उद्योगपती रतन टाटा, गायिका लता मंगेशकर, घटना तज्ज्ञ सुभाष कश्यप, स्टार बॅडमिंटन सायना नेहवाल, योग गुरु बाबा रामदेव, माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचीही भेट घेतली होती.