गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्याच्या प्रकरणाची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधींना सुरतमधील जिल्हा सत्र न्यायालयाने मोदी अवमान प्रकरणी दोषी मानून २ वर्षांची शिक्षा सुनावली. दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची खासदारकी लोकसभेकडून रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर देशभरात विरोधकांनी रान उठवलेलं आहे. त्यावर आज सामनातील आपल्या ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसेच, पंतप्रधान मोदी अदाणींना संरक्षण का देत आहेत? हा प्रश्नही त्यांनी पुन्हा उपस्थित केला आहे.

“मोदींच्या या विधानावर टाळ्या वाजवणारे बिनडोक”

“मोदी-अदानी ही नावे आता भ्रष्टाचाराची प्रतीके झाली आहेत, पण सरकारी भ्रष्टाचारास विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांकडे बोट दाखवून आपले प्रिय पंतप्रधान मोदी म्हणतात, “भ्रष्टाचारात सामील झालेले सर्व चेहरे एकाच मंचावर आले आहेत. मोदी यांचे हे विधान बेताल आहे व मोदींच्या या विधानावर टाळ्या वाजवणारे बिनडोक आहेत. हे लोक देशाला रोज खड्ड्यात टाकत आहेत”, असं राऊतांनी म्हटलं आहे.

देशाच्या परिस्थितीवरचा ‘तो’ विनोद!

दरम्यान, या लेखात संजय राऊतांनी देशातली परिस्थिती सांगण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक विनोद सांगितला आहे. “एक तरुण घरातील चोरीची तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात गेला. “चोरी कशी झाली?” पोलीस. “काय सांगू साहेब, रात्री जाग आली आणि पाहतो तर काय, चोर तिजोरी फोडत होता आणि त्याचा जोडीदार बाहेर उभ्या केलेल्या गाडीत चोरलेल्या सगळ्या वस्तू भरत होता. पण तू चोर चोर, मदत करा असे का ओरडला नाहीस.” पोलीस. “साहेब, चोर चोर ओरडल्यावर दोन वर्षांचा तुरुंगवास होतो व त्यानंतर राहते घरही जप्त होते हे मला माहीत आहे म्हणून गप्प बसलो!” राहुल गांधी यांचे मोदी- अदानी प्रकरण देशात कसे पसरले आहे ते यावरून दिसते”, असं राऊतांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

“२०१४चे शस्त्र आता त्यांच्यावरच उलटताना दिसतंय”

“दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयाच्या उद्घाटनास मोदी गेले व त्यांनी आणखी एक विनोद केला, “आमचा पक्ष सोशल मीडियावर चालत नाही” असे ते म्हणाले. २०१४ पासून समाज माध्यमांचा गैरवापर करून विरोधकांना बदनाम करणारा हा पक्ष. शेकडो कोटी रुपये खोटेपणाचा प्रचार करण्यासाठी या लोकांनी उडवले. भ्रष्टाचार आणि लुटीतून मिळालेला हा पैसा होता. आज तोच सोशल मीडिया मोदी व त्यांच्या पक्षाला रोज नागडा करीत आहे. २०१४ चे शस्त्र आता त्यांच्यावर उलटताना दिसत आहे”, असा दावा राऊतांनी केला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सभा अन् यात्रा ; एकाच वेळी महाविकास आघाडी तसेच भाजपचे शक्तिप्रदर्शन

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत मोदी-अदाणी संबंधांबाबत केलेला दावा राऊतांनी लेखात मांडला आहे. “अदानी यांची सर्व संपत्ती ही मोदी यांचीच आहे. अदानी हा फक्त चेहरा आहे. त्यांच्या सर्व संपत्तीचे खरे मालक आपले फकीर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत केला. मोदी व त्यांच्या मंडळींचा पैसा अदानी मॅनेज करतात व अदानी यांना फक्त १०-२० टक्के कमिशन मिळते, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल पुराव्यासह करतात व ईडी, सीबीआय त्यावर गप्प बसते. न्यायालये स्युमोटो पद्धतीने पुढे जात नाहीत. अशा विकलांग अवस्थेत आज आपला देश आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी आपला निषेध व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाभारतातील ‘तो’ प्रसंग…!

दरम्यान, आपल्या लेखात संजय राऊतांनी धर्मराज युधिष्ठिर महाभारतात आपल्या भावांना शोधण्यासाठी वनात गेला असता तळ्याकाठी यक्षानं त्याला प्रश्न विचारल्याच्या प्रसंगात अदाणींचा उल्लेख केला आहे. “धर्मराजाला यक्षानं प्रश्न विचारला, “धर्मराज सांग, अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? पहिल्याच प्रश्नाने धर्मराज गोंधळला. यक्षाकडे त्याने हतबलतेने पाहिले. कोपरापासून नमस्कार केला. “येतो मी” सांगून मागे फिरला व तहानेने व्याकूळ होऊन आपल्या भावांच्या जवळ कोसळला”, असा खोचक उल्लेख संजय राऊतांनी केला आहे!