पीटीआय, गुमला (झारखंड)

करोनाकाळानंतर संपूर्ण जगाला कळले की भारताकडे शांतता आणि आनंदाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी केले. सनातन धर्म मानवजातीच्या कल्याणावर विश्वास ठेवतो, असेही त्यांनी नमूद केले.

‘‘गेल्या २००० वर्षांत वेगवेगळे प्रयोग केले गेले, पण ते भारताच्या पारंपरिक जीवन पद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. करोनानंतर जगाला कळले की भारताकडे शांती आणि आनंदाचा रोडमॅप आहे, असे भागवत म्हणाले. ‘विकास भारती’ या ना-नफा संस्थेने आयोजित केलेल्या ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सरसंघचालक बोलत होते.

हेही वाचा >>>करोनानंतर जगाला कळले, भारताकडे शांतता, आनंदाचा मार्ग; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

सनातन संस्कृती आणि धर्म राजवाड्यांमधून आलेले नाहीत, तर आश्रम आणि जंगलातून आले आहेत. बदलत्या काळानुसार आपले कपडे बदलू शकतात, पण आपला स्वभाव कधीच बदलणार नाही, असे भागवत म्हणाले. बदलत्या काळात आपले कार्य आणि सेवा सुरू ठेवण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग आणि पद्धतींशी जुळवून घेणे आवश्यक आहे. जे आपला स्वभाव अबाधित ठेवतात, त्यांना विकसित म्हटले जाते. समाजाच्या हितासाठी सर्वांनी अविरतपणे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन भागवत यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आदिवासींसाठी काम करण्याची गरज’

आदिवासी समाज मागासलेला असून त्यांच्यासाठी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात खूप काम करण्याची गरज आहे, असे भागवत यांनी सांगितले. वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासींमध्ये शांतता व साधे जीवन आढळून येते, जे मोठ्या शहरांमध्ये आढळत नाही. येथे मी गावकऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, परंतु शहरांमध्ये आपण कोणाशी बोलत आहोत याची काळजी घ्यावी लागेल, असे सरसंघचालकांनी सांगितले.