सौदी अरेबिया त्यांचा अण्विक कचरा टाकण्यासाठी कतारला लागून असणाऱ्या समुद्र सीमेवर कालवा बांधण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची शक्यता आहे असे वृत्त सौदी अरेबियातील एका वर्तमानपत्राने दिले आहे. या प्रकल्पाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नसून त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. या प्रस्तावामुळे सौदी आणि कतारमध्ये मागच्या दहा महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त आणि बहरीन या चार देशांचा कतारला तीव्र विरोध आहे. हे चारही देश कतारवर दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत असून आखातामधील इस्लामविरोधी शक्तिंना मदत करण्याचा ठपका कतारवर ठेवण्यात आला आहे. कतारची इराणबरोबर वाढलेली जवळीकही आखातामधील अनेक देशांना पटलेली नाही.

समुद्र सीमेजवळ अण्विक कचरा टाकण्यासाठी कालवा बांधणे म्हणजे आमच्या सार्वभौमत्वाला धोक्यात घालण्याचा हा प्रयत्न आहे असे कतारतने म्हटले आहे. कतारवर शासन करणारे सध्याचे राजे शेख तमीम बिन हमाद अल तहानी यांनी सोमवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. आज ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत.

सौदी अरेबिया कतारला लागून असणाऱ्या सीमेवर लष्करी तळ उभारण्याचा विचार करत आहे. तिथेच दुसऱ्या बाजूला अणूभट्टीमधील अण्विक कचरा टाकण्यासाठी कालवा बांधण्याची योजना आहे असे साबक आणि अल रियाध या वर्तमानपत्रांनी म्हटले आहे.