Prayagraj News : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एक तरुण सौदी अरेबियात अडकल्याचा दावा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तो तरुण पुन्हा भारतात परतण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचं दिसत आहे. मात्र, या प्रकरणात आता सौदी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

सौदी पोलिसांनी काय म्हटलं?

एका तरुणाचा व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रभाव पाडण्यासाठी होता, असा दावा सौदी पोलिसांनी केला असल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. सौदी अरेबियात अडकल्याचा दावा करत आणि मदतीची याचना करत व्हायरल झालेल्या तरुणाचा व्हिडीओ हा केवळ सोशल मीडियावर लक्ष वेधण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला असल्याचं सौदी पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

सौदी पोलिसांच्या मीडिया प्रवक्त्याने स्पष्ट केलं की, “व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्ह्यूजची संख्या वाढवण्यासाठी हा व्हिडीओ बनवला असल्याचं आढळून आलं”, असं पोलिसांनी म्हटलं. तसेच अधिकाऱ्यांनी पुढं असंही म्हटलं की, तो तरुण आणि त्याच्या मालकामध्ये कोणताही वाद नव्हता आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

तरुणाने व्हायरल व्हिडीओ काय म्हटलं होतं?

व्हायरल व्हिडीओमध्ये हा तरुण दावा करत आहे की त्याचा पासपोर्ट कपिल नावाच्या व्यक्तीने (कदाचित त्याचा मालक) घेतला आहे. त्यामुळे त्या तरुणाला परत भारतात येता येत नाहीये. त्यामुळे तो मदतीसाठी आवाहन करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हा युवक वाळवंटात उंट सांभाळताना व्हिडीओत दिसत होता. यावेळी तो त्याच्या मदतीसाठी व्हिडीओ बनवत असल्याचं दिसत होतं. तसेच हा व्हिडीओ बनवताना तो रडत असल्याचंही दिसत होतं. त्या व्हिडीओमध्ये हा तरुण म्हणत आहे की, “माझं गाव अलाहाबादमध्ये आहे. मी सौदी अरेबियाला आलो होतो, कपिलकडे माझा पासपोर्ट आहे. मी त्याला घरी जायचं असं सांगितलं, पण तो मला धमकी देत ​​आहे.”

“हा व्हिडीओ इतका शेअर करा की, तुमच्या भारतातील पाठिंब्याने मला मदत मिळू शकेल आणि मी भारतात परत येऊ शकेन. तुम्ही मुस्लिम, हिंदू किंवा कोणीही असाल तरी तुम्ही कृपया मदत करा. नाही तर मी इथेच मरून जाईन. मला माझ्या आईकडे जायचं आहे. हा व्हिडीओ इतका शेअर करा की तो पंतप्रधानांपर्यंत पोहोचेल”, असं तो तरुण व्हिडीओत म्हणत असल्याचं दिसून आलं होतं.