ग्राहकांच्या एका चुकीमुळे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) ने गेल्या 40 महिन्यांमध्ये 38 कोटी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे. धनादेशावरील स्वाक्षरी न जुळल्याने एसबीआयने एवढी रक्कम ग्राहकांच्या खात्यातून कमी केली आहे.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, स्टेट बॅंक ऑफ इंडियाने गेल्या 40 महिन्यांमध्ये 24 लाख 71 हजार 544 लाख धनादेश स्वाक्षरी न जुळल्याने परत पाठवले. एका आरटीआयचं उत्तर देताना बॅंकेने मान्य केलं की, कोणताही धनादेश परत होतो (चेक रिटर्न) त्यावेळी बॅंकेकडून १५० रुपये चार्ज आकारला जातो, तसंच त्यावर जीएसटीही लागतो. म्हणजे प्रत्येक चेक रिटर्न झाल्यावर खातेदाराला १५७ रुपयांचा भुर्दंड बसला.
आर्थिक वर्ष ( परत गेलेले चेक)
2015-16 60,0169
2016-17 99,2474
2017-18 79,5769
2018-19 83,132 (केवळ एप्रिल)
यापूर्वी जानेवारीमध्ये आलेल्या एका अहवालानुसार एसबीआयने खात्यामध्ये किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) न ठेवणाऱ्यांकडून 1771 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले होते. मिनिमम बॅलन्स म्हणून वसूल करण्यात आलेली ही रक्कम एसबीआयच्या दुसऱ्या तिमाहीच्या नेट प्रॉफिटपेक्षाही जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत एसबीआयचं नेट प्रॉफिट १५८१.५५ कोटी रुपये होतं.