Online Banking Website: ऑनलाईन फसवणूक हा प्रकार हल्ली वारंवार ऐकायला, पाहायला किंवा काही दुर्वैवी प्रसंगी अनुभवायलादेखील मिळतो. ऑनलाईन फसवणूक करून लाखोंची रक्कम काही क्षणांत खात्यांमधून गायब करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, कुणालाही वैयक्तिक वा बँकिंगसंदर्भातली माहिती देऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जातं. आता अशी फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या आदेशांनुसार देशातील सर्व बँकांनी त्यांच्या वेबसाईटमध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे. खोट्या वेबसाईटकडून फसवणूक टाळण्यासाठी हा फरक माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे.
काय आहेत RBI चे निर्देश?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यांदर्भात या वर्षाच्या सुरुवातीला ७ फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक जारी केलं. यामध्ये फसवणुकीसंदर्भातील उपायावर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. “फिशिंगसारखे प्रकार आणि सायबर सुरक्षेला असणारे धोके कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे डिजिटल बँकिंग आणि पेमेंट सेवेवरील ग्राहकांचा विश्वास अधिक वाढेल”, असं आरबीआयनं नमूद केलं आहे. सर्व बँकांना संकेतस्थळांची नोंदणी एप्रिल २०२५ पासून खुली करण्यात आली. ३१ ऑक्टोबरच्या आधी सर्व बँकांनी आपापल्या संकेतस्थळांची नव्याने नोंदणी करावी, असंही RBI नं सांगितलं होतं.
काय आहे संकेतस्थळांमधील बदल?
आरबीआयने बँकांच्या संकेतस्थळांच्या यूआरएलमध्ये एक छोटा बदल करण्यास सांगितले आहे. अनेकदा फसवणूक करणाऱ्यांकडून बँकांच्या बनावट वेबसाईट्सचा वापर करून खातेदारांना लुटले जाते. या बनावट वेबसाईट्स इतक्या हुबेहूब असतात, की आपण फसवले जात आहोत, याची जराही शंका खातेदारांच्या मनात येत नाही. या बनावट वेबसाईट्सवर खातेदार आपली माहिती भरतात आणि काही क्षणांत त्यांच्या खात्यावरील रक्कम फसवणूक करणाऱ्या टोळ्यांकडून काढून घेतली जाते.
कशा असतील बँकांच्या बदललेल्या वेबसाईट्स?
| बँक | संकेतस्थळ |
| SBI | https://sbi.bank.in |
| ICICI Bank | https://www.icici.bank.in/ |
| HDFC Bank | https://www.hdfc.bank.in/ |
| Axis Bank | https://www.axis.bank.in/ |
| Kotak Mahindra Bank | https://pnb.bank.in/ |
या पार्श्वभूमीवर आरबीआयने bank.in या डोमेनवर सर्व बँकांना नोंदणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत sbi.com किंवा hdfc.com असे यूआरएल असणाऱ्या बँकांच्या वेबसाईट्सचे यूआरएल आता sbi.bank.in किंवा hdfc.bank.in असे असतील. त्यामुळे बनावट वेबसाईट्स ओळखणं खातेदारांसाठी सोपं होणार आहे. फसवणूक करणाऱ्या टोळ्यांकडून या वेबसाईट्सच्या यूआरएलमध्ये sbi-bank.in किंवा hdfc-india.in अशा प्रकारचे बदल करून खातेदारांना फसवलं जातं. मात्र, नव्या बदलामुळे हे प्रकार टाळण्यास मदत होणार आहे.
कोणत्या बँकांनी वेबसाईटमध्ये बदल केले?
दरम्यान, आरबीआयच्या निर्देशांनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅरा बँक या बँकांनी त्यांच्या वेबसाईट यूआरएलमध्ये bank.in हे बदल केले आहेत. एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस अशा इतर काही बँकांनी हे बदल करण्यासाठी काही अवधी मागितला आहे. त्यानंतर या बँकांच्या सर्व विद्यमान सेवा bank.in या नवीन संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असं या बँकांकडून जाहीर करण्यात आलं आहे.
bank.in काय आहे?
ऑनलाईन पेमेंट व्यवस्थेमधील फसवणूक आणि डिजिटल प्रणाली सुरक्षित करण्यासाठी RBI ने .bank.in हे नवीन इंटरनेट डोमेन तयार केलं आहे. इन्स्टिट्युट फॉर डेव्हलपमेंट अँड रीसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी अर्थात IDRBT, नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडिया अर्थात NIXI आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या नवीन डोमेनच्या संकल्पनेवर संयुक्तपणे काम करण्यात आलं आहे.
