महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्याविरुद्ध पेड न्यूज संदर्भातील माधव किन्हाळकर यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. यामुळे चव्हाण यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, याआधी निवडणूक आयोगाने चव्हाण यांना नोटीस बजावल्याचे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाने १५ दिवसांत निकालात काढावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
अशोक चव्हाण यांनी निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व का रद्द करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस निवडणूक आयोगाने पाठविली होती. यावर उत्तर देण्याआधीच चव्हाण यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा न्यायालयाने पाच नोव्हेंबरपर्यंत निवडणूक आयोगाच्या नोटीसीला स्थगिती दिली होती. या स्थगिती विरोधात किन्हाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने चव्हाण यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी दिल्ली उच्च न्यायालयाने आधीच्या प्रकरणाचा निकाल १५ दिवसांत लावावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.