माध्यमांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून होत असलेल्या जाहिरातींबद्दल मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज(बुधवार) तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
सरन्यायाधीश पी.सथशिवम यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून प्रा.एन.आर.माधव मेनन हे या समितीचे प्रमुख असणार आहेत. तर, माजी कायदा सचिव टी.के.विश्वनाथन आणि न्यायाधीश रणजीत कुमार हे सदस्य आहेत. माध्यमांमध्ये देण्यात येणाऱया जाहीराती, घेण्यात आलेले कार्यक्रम ठळकपणे दाखविणे, धोरणे आणि मिळालेले यश यासंबंधिच्या सर्व जाहीराती तसेच राजकीय नेत्यांचे वाढदिवस यांच्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याची नोंद यावेळी सरन्यायाधीशांनी दिली. तसेच समितीला येत्या तीन महिन्यांमध्ये योग्य मार्गदर्शक तत्वे तयार करुन सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.