Online Scam Exposed On X: उत्तर प्रदेशातील रायबरेलीचा रहिवासी असलेला गौरव त्रिवेदी, याच्यावर फेक मायक्रेसॉफ्ट सपोर्ट स्कॅम चालवत असल्याचा आरोप आहे. एका एक्स युजरने गौरव त्रिवेदीचा लॅपटॉप हॅक केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या एक्स युजरने वेबकॅमवर गौरव त्रिवेदीच्या टिपलेल्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
एक्सवर @NanoBaiter नावाच्या युजरने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हा भारतीय स्कॅमर गौरव त्रिवेदी आहे. तो मायक्रोसॉफ्टचा कर्मचारी असल्याचे भासवून, निष्पाप लोकांना लुबाडतो. त्याने मलाही फसवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या जाळ्यात अडकण्याऐवजी मी त्याचाच लॅपटॉप हॅक केला आणि वेबकॅममध्ये त्याच्या प्रतिक्रिया टिपल्या.”
युजरने पुढे म्हटले आहे की, “गौरव हा स्कॅम त्याच्या रायबरेलीतील घरातून चालवतो. पीडिताच्या कंप्युटर किंवा लॅपटॉपवर एक फेक पॉप अप येतो आणि हा स्कॅम सुरू होतो. त्यानंतर स्क्रीन लॉक होते. यानंतर पीडिताला ‘तत्काळ मायक्रोसॉफ्टशी संपर्क करा’ अन्यथा सर्व डाटा गमवाल”, असे सांगितले जाते.
एक्स युजरने गौरवचाच लॅपटॉप कसा हॅक केला?
या युजरने आरोपी गौरवचा लॅपटॉप कसा हॅक केला हे सांगताना स्पष्ट केले की, “पीडितांना जाळ्यात अडकवण्यासाठी गौरव त्यांची दिशाभूल करत एनी डेस्क किंवा टीमव्हिव्हरद्वारे लॅपटॉप किंवा कंप्युटरचा अॅक्सेस मिळवतो. पण, गौरवने मलाही फसवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्याला माझा व्हर्च्युअल मशीनचा अॅक्सेस दिला आणि याद्वारे मी त्याची सिस्टीम हॅक केली.”
युजरने आरोपी गौरवला कसे शोधले?
या युजरने सर्वात आधी, आरोपीचा वेबकॅमचा अॅक्सेस मिळवला आणि त्याच्या चेहऱ्याची छायाचित्रे टिपली. त्यानंतर आरोपीने काहीतरी हालचाल केल्यानंतर स्क्रीनवर गौरव त्रिवेदी असे नाव दिसले. त्याच्या लॅपटॉपवरील वायफाय कार्ड अॅक्टिव्ह होते, ज्यामुळे मला त्याचे लोकेशन मिळवता आले.
पोलिसांना आवाहन
“गौरवच्या वेबकॅमद्वारे मला, तो तो जेवताना, झोपताना आणि नंतर निष्पाप लोकांना फसवताना पाहायला मिळाले”, असेही एक्स युजर त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
यावेळी रायबरेली पोलिसांना आवाहन करताना हा एक्स युजर म्हणाला की, “गौरव त्रिवेदीसारखे स्कॅमर्स लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. याबाबत मी अनेकदा आवाज उठवला आहे. पण, आता यावर कारवाई करण्याची गरज आहे. कृपया, निष्पाप लोकांना वाचवण्यासाठी पाऊले उचला.”