चीनमध्ये सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत (एससीओ) सदस्य देशांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. ‘पहलगाम हल्ला हा केवळ भारताच्या सद्सद्विवेकबुद्धीवर झालेला नव्हता, तर मानवतेवर ज्यांचा विश्वास आहे, अशा सर्वांवरचा तो हल्ला होता. दहशतवादाविरोधातील लढ्यात दुटप्पीपणाला स्थान नाही,’ असे प्रतिपादन या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
एससीओ शिखर परिषदेत सदस्य देशांनी संयुक्त जाहीरनाम्यातील निवेदनात दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका स्वीकारली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह इतर जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे थेट नाव न घेता मोदी म्हणाले, ‘दहशतवादाविरुद्ध लढा हे मानवतेसाठी कर्तव्य आहे. काही देश दहशतवादाला खुला पाठिंबा देतात. हे आपल्याला स्वीकारार्ह आहे का, असे विचारणे अगदीच स्वाभाविक आहे. आपण अगदी स्पष्टपणे आणि एकसुरात म्हटले पाहिजे, दहशतवादाविरुद्ध दुटप्पीपणा स्वीकारार्ह नाही. आपण सगळ्यांनी मिळून दहशतवादाच्या प्रत्येक प्रकारचा विरोध करायला हवा. मानवतेसाठी ही आपली जबाबदारी आहे.’
भारत दीर्घ काळापासून दहशतवादाचा सामना करीत असल्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, ‘अनेक मातांनी त्यांची मुले गमावली आहेत आणि अनेक मुले अनाथ झाली आहेत. आम्ही पहलगाम येथे नुकताच एक भीषण दहशतवादी पाहिला. हा हल्ला केवळ भारताच्या सद्सद्विवेकबुद्धीवरील नव्हता, तर ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे, अशा सर्वांवरील तो हल्ला होता. या दुःखाच्या काळात जे मित्रदेश आमच्या पाठीशी राहिले, त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे.’
‘सुरक्षा, संपर्क आणि संधी’
शांघाय सहकार्य संघटना अर्थात ‘एससीओ’ याला मोदींनी ‘सुरक्षा, संपर्क आणि संधी’ (सिक्युरिटी, कनेक्टिव्हिटी आणि ऑपॉर्च्युनिटी) असे संबोधले. ते म्हणाले, ‘‘एस’ म्हणजे सुरक्षा ‘सी’ म्हणजे संपर्क आणि ‘ओ’ म्हणजे संधी. सुरक्षा, शांतता, स्थिरता ही कुठल्याही देशाच्या विकासाचा पाया असते. मात्र, दहशतवाद, फुटिरतावाद, कट्टरतावाद हे या मार्गावरील सर्वांत मोठी आव्हाने आहेत. दहशतवाद हे कुठल्याही एका देशासमोरील आव्हान नसून, मानवतेसमोरील आहे. कुठल्याही देशाने आपण दहशतवादापासून पूर्ण सुरक्षित आहोत, असे समजू नये. त्यामुळेच भारत सातत्याने दहशतवादाविरोधात लढताना एकतेचे महत्त्व सांगतो.’ पंतप्रधानांनी प्रादेशिक वाढ आणि विकासासाठी संपर्क यंत्रणेचेही महत्त्व सांगितले.