दिल्लीमध्ये आता भिन्नलिंगी ग्राहकाची मसाज केली जाणार नाही. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने स्पा आणि पार्लरमध्ये भिन्नलिंगी ग्राहकाची मसाज करण्यास बंदी घातली आहे. तशा सक्त सूचना मनपाने स्पा आणि पार्लरच्या चालकांना दिल्या आहेत. मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचा अहवाल आल्यानंतर मनपाने हा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल आणि सदस्या किरण नेगी यांनी नवाडा, द्वारका आणि मधू विहारमध्ये वेश्याव्यवसाय चालणाऱ्या स्पा आणि पार्लरवर धाडी टाकल्या होत्या. ५ सप्टेंबर रोजी आयोगाने ही कारवाई केली होती. या कारवाईत नऊ मुलींची सुटका करण्यात आली होती. यात काही शाळकरी मुलीही आढळल्या होत्या.

या कारवाईनंतर आयोगाने महानगरपालिकेच्या तीन अधिकाऱ्यांसह दिल्ली पोलिसांना समन्स बजावले होते. “या स्पा आणि मसाज पार्लरला परवाने कसे दिले,” अशी विचारणा आयोगाने केली आहे. यावर महापालिकेचे सभागृह नेते कमलजित सेरावत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात २९७ स्पा आणि मसाज पार्लरला आरोग्यविषय व्यवसाय परवाने देण्यात आले आहे. आमच्या माहितीप्रमाणे बहुतांश पंचतारांकित हॉटेल आणि पारंपरिक मसाज केंद्रांमध्ये सुरू आहेत. जर अनैतिक व्यापार करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही त्यांच्याविरूद्ध कारवाई करू,” असे ते म्हणाले.

दरम्यान, महिला आयोगाने समन्स बजावल्यानंतर दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने कार्यक्षेत्रातील सर्व स्पा आणि पार्लरला भिन्नलिंगी ग्राहकांची मसाज करण्यावर बंदी घातली आहे. तसे निर्देश जारी करण्यात आले आहेत. भिन्नलिंगी मसाज पूर्णपणे बंद करावे, प्रवेशद्वार आणि बाहेर पडायच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात यावे, १८ वर्षावरील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच ठेवण्यात यावे तसेच ग्राहकांच्या ओळखपत्राची प्रत जमा करावी आदी सूचना करण्यात आल्या आहेत. नियमांचा भंग केल्यास परवाना रद्द करण्याचा इशाराही मनपा प्रशासनाने दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sdmc banned on cross gender massages bmh
First published on: 17-09-2019 at 12:03 IST