पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगालच्या राजभवनात सोमवारी शोधमोहीम राबवण्यात आली. खुद्द राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनीच या मोहिमेचे नेतृत्व केले. “राज्यपालांनी राजभवनात भाजपच्या गुन्हेगारांना आश्रय दिला असून त्यांना बॉम्ब आणि बंदुका पुरवल्या जात आहेत,” असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी शनिवारी केला होता. त्यानंतर बोस यांनी शोधमोहिमेसाठी पुढाकार घेतला.

राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “राज्यपाल बोस कोलकाता पोलीस अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा दलांचा समावेश असलेल्या पथकाचे नेतृत्व करत आहेत. राजभवनात शस्त्रे आणि दारुगोळा दडवून ठेवला आहे का शोधण्यासाठी बॉम्बशोधक पथक आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे.” त्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण विभागाचे अधिकारीही या शोधमोहिमेत सहभागी असल्याचे सांगण्यात आले.

कल्याण बॅनर्जी यांनी आरोप केला तेव्हा बोस उत्तर बंगालच्या दौऱ्यावर होते. तो दौरा अर्धवट सोडून ते परत आले, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. या शोधमोहिमेसाठी राजभवनाचा परिसर रिकामा करण्यात आला होता.