दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी ९६ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपकडे सध्या २७ जागा असून, या जागा कायम राखण्याचे आव्हान आहे. राज्यातील दहापैकी आठ जागा युती तर दोन जागा आघाडीकडे आहेत. तामिळनाडूतील वेल्लोर येथे १८ एप्रिलला निवडणूक होणार होती. ती रद्द करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात गेल्या आठवडय़ात ९१ मतदारसंघांत मतदान पार पडले. यामध्ये भाजपचे खासदार असलेल्या ३२ मतदारसंघांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील आठ मतदारसंघांत मतदान होत आहे. गेल्या वेळी आठही जागा भाजपने जिंकल्या होत्या. सरकारच्या विरोधातील नाराजी, समाजवादी पार्टी आणि बसपाची युती यामुळे भाजपपुढे आव्हान सोपे नाही. तरीही काँग्रेस रिंगणात असल्याने होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात साखरेचे थकलेले पैसे हा कळीचा मुद्दा आहे. जाट मतदार कोणत्या बाजूला झुकतात यावरही भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.
तमिळनाडूतील ३९ आणि पुण्डेचरीतील एक अशा ४० जागांवर यंदा चुरस आहे. गेल्या वेळी अण्णा द्रमुकने ३९ पैकी ३६ जागा अधिक एक मित्रपक्ष अशा ३७ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजप, अभिनेता विजयन, पीएमके अशा विविध मित्रपक्षांची मोट बांधताना अण्णा द्रमुकच्या वाटय़ाला फक्त २० जागाच आल्या आहेत. द्रमुक, काँग्रेस आघाडीने जास्तीत जास्त जागाजिंकण्यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू तमिळनाडूत चालते का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
कर्नाटकात १४ पैकी काँग्रेस आणि भाजपकडे सध्या प्रत्येकी सहा तर जनता दलाकडे (धर्मनिरपेक्ष) दोन जागा आहेत. काँग्रेस आणि जनता दलात झालेल्या आघाडीमुळे यंदा भाजपचे संख्याबळ कमी होईल, असे कागदावरील चित्र असले तरी प्रत्यक्षात मतदार काँग्रेस की भाजप कोणाला कौल देतात यावरही सारे अवलंबून आहे. आसामात पाच जागांसाठी मतदान होत असून, नागरिकत्व विधेयकाच्या मुद्दय़ावर काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रात कोण बाजी मारणार?
राज्यातील विदर्भातील तीन, मराठवाडय़ातील सहा तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर अशा दहा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. गेल्या वेळी नांदेड आणि हिंगोलीचा अपवाद वगळता साऱ्या जागा युतीने जिंकल्या होत्या. विदर्भात पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघात भाजपच्या विरोधात मतदान झाल्याचा अंदाज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. यंदा सर्व जागा कायम राखणे कठीण असल्याचे भाजपचे नेते खासगीत मान्य करतात.
दावे-प्रतिदावे
विदर्भाचा पहिल्या टप्प्याचा कल कायम राहील आणि मराठवाडय़ातही सत्ताधारी युतीच्या विरोधात मतदान होईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पण चव्हाण यांचा हा दावा भाजपचे विनोद तावडे यांनी फेटाळून लावला. राज्यात युतीलाच चांगले यश मिळेल, असा दावा तावडे यांनी केला.
पक्षनिहाय संख्याबळ पुढीलप्रमाणे
एकूण मतदारसंघ – ९७
अण्णा द्रमुक- ३६
भाजप- २७
काँग्रेस- १२
बिजू जनता दल- ४
शिवेसेना- ४
जनता दल (धर्मनिरपेक्ष)- २
राष्ट्रीय जनता दल- २
माकप- २
जनता दल (सं)- १
तृणमूल काँग्रेस- १
युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट- १
एआयएनआर. काँग्रेस- १
राष्ट्रवादी काँग्रेस- १
पीएमके- १
नॅशनल कॉन्फरन्स- १
युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट- १