Spouse Secretly Recorded Phone Call What SC Says: सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या एका घटस्फोट प्रकरणात एक महत्त्वाचा निकाल देण्यात आला आहे. जोडीदाराने गुप्तपणे रेकॉर्ड केलेला फोन हा गोपनियतेच्या मूलभूत अधिकाराचे हनन असल्याचे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असता सर्वोच्च न्यायालयाने हा पुरावा ग्राह्य धरला. जर पती-पत्नी गुप्तपणे एकमेकांचे कॉल रेकॉर्ड करत असतील तर हे नाते तुटल्याचेच द्योतक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

तत्पूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात जेव्हा या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा उच्च न्यायालयाने संबंधित पुरावा ग्राह्य धरण्यास नकार दिला. पत्नीचे फोन कॉल गुप्तपणे रेकॉर्ड करणे हे तिच्या गोपनीयतेच्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे हा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायाधीश एस. सी शर्मा यांच्या खंडपीठासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला की, अशा प्रकारच्या पुराव्याला परवानगी दिल्यास कुटुंबातील संवाद आणि वैवाहिक नातेसंबंधात खळबळ उडेल. यामुळे जोडीदार एकमेकांवर नजर ठेवतील. तसेच पुरावा कायद्याच्या कलम १२२ लाही यामुळे धक्का बसेल.

खंडपीठाने म्हटले की, हा युक्तिवाद टिकाऊ आहे, असे आम्हाला वाटत नाही. जर जोडीदार एकमेकांवर पाळत ठेवत असतील तर ते नाते तुटल्यासारखेच आहे. या नात्यातील विश्वास संपल्याचे हे द्योतक आहे.

प्रकरण काय होते?

सदर घटस्फोट प्रकरण हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३ नुसार पहिल्यांदा भटिंडा कौटुंबिक न्यायालयात उपस्थित झाले होते. पतीने पत्नीवर क्रुरतेचा आरोप केला होता. यासाठी पुरावा म्हणून दोघांचे फोनवरील रेकॉर्ड केलेले संभाषण न्यायालयासमोर मांडले होते. कौटुंबिक न्यायालयाने हा पुरावा मान्य केला. मात्र पत्नीने याला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पतीने आपल्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड केला, त्यामुळे हा गोपनियतेच्या कायद्याचा भंग होत असून आपल्या मुलभूत अधिकाराचे हनन होत आहे. उच्च न्यायालयाने पत्नीच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करत कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावला होता. त्यानंतर या निर्णयाला पतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.