पीटीआय, इम्फाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी होणाऱ्या मणिपूर दौऱ्यापूर्वी इम्फाळ आणि जिल्हा मुख्यालय असलेल्या चुराचंदपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इम्फाळमधील २३७ एकरवर पसरलेल्या कांगला किल्ल्याभोवती आणि चुराचंदपूरमधील शांतता मैदानाभोवती मोठ्या संख्येने राज्य आणि केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारण्यात येत आहे.

मोदी मिझोरामहून मणिपूरला पोहोचण्याची शक्यता असली तरी या संदर्भात नवी दिल्ली किंवा इम्फाळकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पूर्वतयारी बैठकाही घेण्यात आल्या आहेत.किल्ला परिसरात प्रशिक्षित कुत्र्यांच्या गस्तीसह कसून तपासणीही केली जात आहे. तसेच किल्ल्यावर पर्यटकांचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला असल्याचे एका केंद्रीय सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. यासोबतच परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून उच्चाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नागा संघटनेला ‘आर्थिक नाकेबंदी’ मागे घेण्याचे आवाहन

मणिपूर सरकारने राज्यातील नागा लोकांची सर्वोच्च संघटना असलेल्या युनायटेड नागा कौन्सिलला (यूएनसी) नागाबहुल भागात राष्ट्रीय महामार्गावरील अनिश्चित काळासाठी लादलेली आर्थिक नाकेबंदी मागे घेण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात मणिपूरचे मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांनी यूएनसी अध्यक्षांना पत्र लिहिले असून त्यात नागाबहुल भागात भारत आणि म्यानमार यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण घालण्याच्या मुद्द्यावर गृह मंत्रालय यूएनसीशी चर्चा करीत असल्याचे नमूद केले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकेबंदीमुळे सेनापती आणि तामेंगलाँग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोन तसेच ३७वर शेकडो ट्रक आणि इंधन वाहून नेणारे ट्रक अडकले आहेत.