मद्यसम्राट पॉण्टी चढ्ढा याच्या चार सुरक्षारक्षकांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. गेल्या शनिवारी पॉण्टीचा भाऊ हरदीप याच्या दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर येथील फार्महाऊसवर या चौघांनी घुसखोरी करत फार्महाऊसमधील लोकांना मारहाण केली तसेच त्यांच्याकडील मोबाइल फोन हिसकावून घेत हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर थोडय़ाच वेळात पॉण्टी व हरदीप यांच्यात गोळीबार होऊन दोघेही मृत्यूमुखी पडले.
पॉण्टी आणि हरदीप यांच्यात मालमत्तेवरून वाद होता. तो सोडवण्यासाठी शनिवारी हरदीप याने पॉण्टीला फार्महाऊसवर आमंत्रित केले होते. मात्र, त्याच दिवशी सकाळी पॉण्टीच्या चारही सुरक्षारक्षकांनी फार्महाऊसवर जाऊन धुडगूस घातला. तेथील लोकांवर दहशत पसरवून हे चौघेही पसार झाले होते. या प्रकाराची पोलिसांत तक्रार करूनही काहीच कारवाई झाली नव्हती. या प्रकारानंतर अवघ्या दीड तासांतच पॉण्टी आणि हरदीप यांच्यात याच फार्महाऊसवर वाद होऊन त्याचे पर्यवसान परस्परांवर गोळीबार करण्यात झाले. त्यात दोघेही मृत्यूमुखी पडले. या सर्व पाश्र्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी या चारही सुरक्षारक्षकांना अटक केली. भूपिंदरसिंह बिश्त, राजपाल आणि आनंदसिंह बिश्त व उदयराजसिंह अशी त्यांची नावे आहेत.