Will Seema Haider Sent Back to Pakistan: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासह जगभरातल्या देशांकडून पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध केला जात आहे. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. त्यात पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी करण्याबरोबरच भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यावरून देशभरात संताप व्यक्त होत असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भावना देशवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात पहिलं पाऊल म्हणून भारत सरकारने पाकिस्तानवर निर्बंध लादले आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांशी संपर्क साधून त्या त्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची यादी करून त्यांना परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यात सीमा हैदरचीही परत पाठवणी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना तिच्या वकिलांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रियकरासाठी भारतात पळून आलेली सीमा

२०२३ साली सीमा तिच्या चार मुलांसह हैदर पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात पळून आली होती. पाकिस्तानात पती गुलाम हैदरच्या छळाला कंटाळून सीमा भारतात आली. ग्रेटर नोएडामध्ये राहणारा प्रियकर सचिन मीनाबरोबर सीमानं हिंदू पद्धतीने विवाह केला. पण भारतीय कायद्यानुसार सीमा हैदरनं भारतात बैकायदेशीररीत्या प्रवेश केला असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानुसार तिच्या नागरिकत्वासंदर्भातला खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

“सीमा भारतीयच”, वकिलांचा दावा!

दरम्यान, भारत सरकारनं सर्व पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे निर्देश दिल्यानंतर सीमा हैदरच्या नागरिकत्वाची चर्चा होऊ लागली. मात्र, ती भारतीयच असल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला आहे. “सीमा आता पाकिस्तानी नागरिक नाही. तिनं सचिन मीना यांच्याशी लग्न केलं आहे. शिवाय नुकतंच सीमानं एका मुलील जन्म दिला असून तिचं नाव भारती मीना असं आहे. आता तिचं नागरिकत्व तिच्या पतीच्या नागरिकत्वाशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं जारी केलेले आदेश सीमा हैदरला लागू होत नाहीत”, अशी भूमिका वकील ए. पी. सिंह यांनी पीटीआयशी बोलताना मांडली.

“केंद्र सरकारचे आदेश फक्त त्याच लोकांना लागू होतात, ज्यांच्याकडे पाकिस्तानी नागरिकत्व आहे. सीमा सध्या भारतात आहे. ती एक भारतीय आहे. कोणत्याही महिलेचं नागरिकत्व हे लग्नानंतर तिच्या पतीच्या नागरिकत्वाशी जोडलं जातं. त्यामुळे सीमा हैदर आता भारतीय ठरते. शिवाय सीमा हैदरचं प्रकरण इतर पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे नाही. तिच्या नागरिकत्वाचा मुद्दा भारतात न्यायप्रविष्ठ असून दहशतवादविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे”, असंही ए. पी. सिंह यांनी नमूद केलं.

राष्ट्रपतींकडेही केला अर्ज

दरम्यान, सीमा हैदरसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडेही अर्ज केल्याचं सिंह म्हणाले. “सीमा सध्या जामिनावर बाहेर आहे. शिवाय, न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहे. तिच्या सासू-सासऱ्यांना सोडून न जाण्याच्या आदेशांचंही ती पालन करते आहे”, असं ते म्हणाले.

“आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार एक आईच तिच्या मुलांची सर्वात चांगली पालक असू शकते. मग तुम्हाला भारतात जन्मलेल्या एका मुलीला पाकिस्तानात पाठवायचं आहे का? भारती मीनाच्या जन्माच्या दाखल्यावरदेखील सीमा मीनाचं नाव आई म्हणून नमूद आहे. त्यामुळे सीमा आपोआपच भारतीय समाजाचा एक घटक ठरते. पालकत्वाचा कायदा सांगतो की मूल हे आईसोबतच राहायला हवं. त्यानुसार सीमाला केंद्राच्या आदेशांमधून वगळलं जायला हवं”, असंही त्यांनी नमूद केलं.