Seer Forced to Quit Mutt in Karnataka : कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलपेट तालुक्यात एका २२ वर्षीय महंतांना काही गावकऱ्यांनी मठ सोडून जाण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. बसव दिक्षा घेण्याच्या आधी तो मुस्लीम धर्मीय होता असे कारण देत काही गावकऱ्यांनी त्याच्या भूमिकेवर आक्षेप घेत महंतांना मठ सोडायला भाग पाडले.
मिळालेल्या माहितीनुसार, निजलिंग स्वामीजी (२२) यांनी पाच वर्षांपूर्वी दिक्षा घेतली आणि त्यांना निजलिंग स्वामीजी असे नाव देण्यात आले. त्यानंतर त्यांनी दीड महिन्यापूर्वी एक वर्ष जुन्या मठात प्रवेश केला होता.
मात्र बसव दिक्षा घेण्याच्या आधी ते मु्स्लिम धर्मीय होते हे उघड झाल्यानंतर त्यांना मठ सोडण्यास भाग पाडण्यात आले. काही भाविकांनी आरोप केला की जन्माच्या वेळी त्यांचा धर्म मुस्लीम होता याबद्दल त्यांनी अभिषेकाच्यावेळी माहिती दिली नाही. पण आरोप होत असलेल्या महंतांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना याबद्दल सर्वांना महिती होते असे म्हटले आहे. दिक्षा घेण्याच्या आधीचा धर्म आपण कधीही लपवला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चामराजनगरचे एसपी बीटी कविता यांनी सांगितले की या घटनेप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
महंताने दिलं स्पष्टीकरण
कलबुर्गी जिल्ह्यातील असलेले हे स्वामीजी हे ‘वचन’ आणि ‘शरण’ याचे कट्टर अनुयायी आहेत. दिक्षा घेतल्यानंतर ते राज्यभरात वचनाच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. “मठातील एक भाविक माझ्या गुरूंकडे मठात महंत पाठवण्याबाबत विचारणा केली आणि गुरूंची इच्छा लक्षात घेऊन मी येथे रुजू झालो. मी गावांमध्ये वचनांचा प्रसार करण्यात सहभागी झालो,” असे स्वामीजी म्हणाले.
त्यांनी पुढे टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “नुकतेच एका मुलाला माझे आधार कार्ड सापडले, ज्यामध्ये माझ्या बसव दिक्षा घेण्याच्या आधीच्या नावाचा उल्लेख होता. त्याने याबद्दल गावकऱ्यांना माहिती दिली आणि गावातील काही लोकांनी मला मठ सोडायला भाग पाडले.”
बसवण्णांच्या तत्वांचा कट्टर अनुयायी असल्याने मला या घटनेमुळे वाईट वाटले, कारण मी बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या वचनांचा प्रसार करण्यासाठी दिक्षा घेतली होती. मी माझ्या दिक्षा घेण्याच्या आधीच्या धर्मापासून पूर्णपणे वेगळा झालो आहे,” अस स्वमीजी म्हणाले.
“मी बसव दिक्षा घेण्याच्या आधीचा धर्म उघड केला नाही म्हणून मला मठ सोडण्यासाठी भाग पाडले गेले, पण बसव दिक्षा घेण्याच्या आधीच्या धर्माबद्दल सर्वांना माहिती आहे. मी तो कधीही लपवला नाही,” असेही स्वमीजी पुढे बोलतना म्हणाले.