उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्रामगृहात काम करणाऱ्या कामगारानं नोकरी सोडली. या रागातून विश्रामगृहाच्या मालकाच्या मुलाने कामगाराला मारहाण केली. नंतर कर्मचाऱ्याच्या पायाच्या बोटाचा नख काढला. यामध्ये कामगाराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
कानपूरमधील रावतपूर परिसरातील एम ब्लॉक कच्ची मढैया येथे राहणारा बिट्टू ( ५० वर्ष ) विश्रामगृहात काम करत होता. कमी पगार असल्याने बिट्टूने विश्रामगृहातील काम सोडून रूग्णालयात कामास लागला. पण, कामावर परतण्यासाठी विश्रामगृहाचे मालक बिट्टूवर दबाव आणत होते. यास बिट्टूने स्पष्ट नकार दिला.
हेही वाचा : दोन मुस्लीम युवकांच्या हत्येप्रकरणी मोनू मानेसरला अटक, साध्या वेशातील पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बिट्टूच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, विश्रामगृह मालकाच्या मुलाने ६ सप्टेंबरला बिट्टूचं अपहरण केलं. यानंतर काहीजणांनी बिट्टूला बेदम मारहाण केली. तेव्हा, बिट्टूच्या पायाच्या अंगठ्याचा नख काढला. कुत्र्यालाही बिट्टूचा चावा घेण्यास सांगितलं. यानंतर जखमी अवस्थेत बिट्टूला घराच्या जवळ फेकून दिलं.
सकाळी सफाई कामगारांनी बिट्टूला पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी बिट्टूला कानपूरमधील हैलट रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान बिट्टूचा मृत्यू झाला. नंतर कुटुंबीयांनी ९ सप्टेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्यानुसार मुख्य आरोपीसह ३ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर कलम ३०२ आणि एससी-एसटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या संशयावरून मारहाण केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.