scorecardresearch

शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ; फुटीरतावादी यासिन मलिकला समर्थन देताना म्हणाला, “काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी…”

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी यासिन मलिक दोषी आढळला असून त्याने सर्व गुन्हे कबूल केलेत

Shahid Afridi yasin malik
आफ्रिदीने केलं वादग्रस्त ट्विट (फाइल फोटो)

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केल्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. यासीन मलिकने दोन आठवड्यांपूर्वी सर्व आरोप स्वीकारल्यानंतर या प्रकरणामध्ये आज पटियाला न्यायालयाने या प्रकरणात निकाल देताना यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, इतर बेकायदेशीर कारवाया आणि काश्मीरमधील शांतता भंग केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. मात्र या प्रकरणातील आजच्या सुनावणीच्या आधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात गरळ ओकली आहे. ट्विटरवरुन आफ्रिदीने यासिन मलिकविरोधातील हे प्रकरण बनावट असल्याचे आरोप केले आहेत. तसेच त्याने या प्रकरणामध्ये थेट संयुक्त राष्ट्रांनी दखल द्यावी अशी मागणीही केलीय.

नक्की वाचा >> काश्मीरचा उल्लेख करत भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या शाहिद आफ्रिदाला अमित मिश्राचा सणसणीत टोला; म्हणाला, “सर्व काही तुझ्या…”

जम्मू-काश्मीर फुटीरतावादी नेता मोहम्मद यासिन मलिकने दिल्ली एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मलिक याच्यावर दिल्ली उच्च न्यायालयात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) यासह दहशतवादाशी संबंधित अनेक खटले दाखल आहेत. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांच्यासमोर या प्रकरणाची १९ मे रोजी अंतिम सुनावणी झाल्यानंतर आज या प्रकरणातील निकाल समोर आला. असं असतानाच आता या प्रकरणात आफ्रिदीने उडी घेतलीय.

निकाल येण्याआधीच आफ्रिदीने काश्मीरमधील संघर्षावर भाष्य करताना भारताला लक्ष्य केलंय. “मानवी हक्कांच्या निर्घृण उल्लंघनाविरुद्ध टीकात्मक आवाज शांत करण्याचे भारताचे सततचे प्रयत्न व्यर्थ आहेत. काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी सुरु असणारा संघर्ष यासिन मलिकविरोधातील खटल्यांमुळे थांबणार नाही. काश्मीरी नेत्यांविरोधात अशाप्रकारे अयोग्य पद्धतीने बेकायदेशीररित्या सुरु असणाऱ्या प्रकरणांची संयुक्त राष्ट्रांना दखल घ्यावी असं मी आवाहन करतो,” असं ट्विट आफ्रिदीने केलं आहे. आफ्रिदीने या ट्वटमध्ये पाकिस्तानात काश्मीरी संघर्षाचं प्रतिक असणारा झेंडा गच्चीवर फडकवतानाचा स्वत:चा फोटोही पोस्ट केलाय.

आफ्रिदीच्या या ट्विटवरुन त्याच्यावर भारतीयांनी टीकेची झोड उठवली आहे. अशाप्रकारे न्यायालयीन वादांसंदर्भात आणि खास करुन भारत पाकिस्तान वादाबद्दल आफ्रिदेने भाष्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने अशाप्रकारची वायफळ बडबड केल्याची उदाहरणे आहेत.

दरम्यान, मलिकवर भारतीय दंड संहितेच्या कलम १६ (दहशतवाद कायदा), कलम १७ (दहशतवादासाठी निधी), कलम १८ (दहशतवादाचा कट रचणे) आणि कलम २० (दहशतवादी टोळीचा सदस्य) असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यासोबतच त्याच्यावर UAPA, १२०बी (गुन्हेगारी कट) आणि १२४ ए (देशद्रोह) आरोप लावण्यात आले आहेत.

हाफिद सईदने हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी संगनमत करून दहशतवादी कारवाया करण्यासाठी हवाला आणि इतर माध्यमांद्वारे पैशांचा व्यवहार केला. त्यांनी हा पैसा खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी, सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी, शाळा जाळण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी वापरला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एनआयएने भारतीय दंड संहितेच्या कलम १२०बी, १२१, १२१ए आणि यूएपीएच्या कलम १३, १६, १७, १८, २०, ३८, ३९ आणि ४० अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahid afridi tweets in support of separatist yasin malik scsg

ताज्या बातम्या