‘काश्मीर युनिव्हर्सिटी स्टुडण्ट्स युनियन’च्या विद्यार्थ्यांनी दांडगाई करीत येथे सुरू असलेले विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘हैदर’ या चित्रपटाचे बंद पाडल़े  सोमवारी अभिनेता शाहीद कपूर याच्यावरील दृष्यांचे चित्रीकरण सुरू असताना हा प्रकार घडला़ दरम्यान, काश्मीर ही आमच्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया भारद्वाज यांनी या घटनेनंतर व्यक्त केली आह़े
हजरबाल येथील काश्मीर विद्यापीठाच्या आवारात गेल्या दोन आठवडय़ांपासून ‘हैदर’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून त्याठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या बंकरवर तिरंगा ध्वज फडकावण्यास आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी  हा गोंधळ घातल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर चित्रीकरण सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली. परंतु नंतर चित्रीकरण होऊ शकले नाही. या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांना स्थानबद्ध करण्यात आले परंतु विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
संबंधित विद्यार्थी संघटनेने एका निवेदनाद्वारे पोलिसी कारवाईचा निषेध केला आहे. इरफान खान हा कलाकार विद्यापीठाच्या आवारात सिगारेट ओढत असताना विद्यार्थ्यांनी त्यास अटकाव केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. ‘हैदर’ या चित्रपटात शाहीद कपूर, इरफान खान आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका आहेत.
दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील लोक जे काही सहन करीत आहेत, ते बघितल्यावर ही आमच्या जीवनातील सर्वात मोठी अशी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी निदर्शनांनंतर व्यक्त केली. मात्र या निदर्शनांनंतर आपण अकारण क्षुब्ध झालो नाही, असेही ते म्हणाले.
गेल्या दोन दशकांमध्ये काश्मिरी लोकांनी जे काही सहन केले आहे, त्याचे वास्तव चित्रण ‘हैदर’ चित्रपटामध्ये करण्याचे आश्वासनही भारद्वाज यांनी दिले.