महाराष्ट्र सरकार चहावर किती पैसा खर्च करतो यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेचा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. आम्हाला जे परवडतं तेच आम्ही देतो हे सांगून आम्ही चहा देतो असं सांगत तुम्ही जे पिता ते आम्हाला परवडत नाही असं सांगत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीची संस्कृती वेगळी असल्याचे सुचवले. भटा-बामणांची पार्टी म्हणून हिणवलेल्या या पार्टीमध्ये आज समाजातील प्रत्येक घटक असल्याचं फडणवीस म्हणाले.
पवारांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले की तुम्ही उगाच चहावाल्यांच्या नादी लागू नका. जरा 2014 आठवा की चहावाल्यांनी तुमची काय हालत केली. उगाच नादी लागू नका नाहीतर तुमची काय हालत होईल याचा विचार केला असे फडणवीस म्हणाले. 2019 मध्ये भाजपाचाच झेंडा लोकसभा निवडणुकीत फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आणि नरेंद्र मोदींसारखा नेता नाही असे सांगत त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचं आवाहन त्यांनी केलं.
कार्यकर्त्यांमुळेच आपल्याला ही सगळी पदं मिळाली असल्याचं सांगताना फडणवीसांनी आपण सगळे मानसन्मान कार्यकर्त्यांना अर्पण करत असल्याचं सांगितलं. तसेच येत्या निवडणुकांसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं. फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच कार्यकर्त्याचं चीज होतं असं सांगताना त्यांनी गेल्या साडेतीन वर्षांमध्ये एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण न झाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या विरोधकांनी साडेचार लाख रुपयांच्या उंदरांच्या गोळ्या काढल्याचं ते म्हणाले.
मोदीजींसारखा शेर सिंह आमच्या जवळ आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून एकदिलानं निवडणुकांना सामोरे गेलो तर 2019 मध्ये विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीची नौटंकी सुरू झाली असून त्यांना जनता भुलणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.