दुष्काळाच्या मुद्द्यावरून एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाड्यामध्ये राज्य सरकार विरोधात जेलभरो आंदोलन करीत असताना, दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती मिळाली नसली, तरी राज्यातील दुष्काळी स्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत जेलभरो आंदोलन केले. शेतकऱयांना तातडीने कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू कराव्यात आणि शेतकऱयांनी वीजबिल माफी द्यावी, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. याच मुद्द्यांवरून शरद पवार यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती मिळाली. राज्यातील दुष्काळाचा विषय गंभीर असून, नरेंद्र मोदी यांनी त्यात लक्ष घालून आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने शरद पवार यांच्या भेटीचा फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.