चो रामस्वामींना मरणोत्तर पद्मभूषण, अप्पा धर्माधिकारी, विराट कोहली, साक्षी मलिक, दीपा कर्माकर पद्मश्रीचे मानकरी

आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण, क्रीडा, साहित्य, संस्कृती, अध्यात्म आदी क्षेत्रांत अमीट ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा मानाच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या या पुरस्कारांच्या यादीत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे ज्येष्ठश्रेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत पूर्णो अजितोक संगमा यांना पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून भारतीय संघाचा तरुण तडफदार कर्णधार विराट कोहली, ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करणारी साक्षी मलिक, पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा थंगवेलू, भारतीय अंध क्रिकेट संघाचा कर्णधार शेखर नाईक यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

परंपरेनुसार बुधवारी प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची यादी जाहीर झाली. राजकारण, अध्यात्म, संगीत आदी क्षेत्रांत बहुमूल्य कामगिरी बजावणाऱ्या सात मान्यवरांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पद्मभूषण पुरस्कारांच्या यादीतही सात जणांचा समावेश आहे. एकूण ८९ जणांच्या या यादीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांचाही समावेश आहे. विविध क्षेत्रातील १९ महिलांचा पद्म पुरस्कारांच्या यादीत समावेश आहे. पाच जण विदेशी वंशाच्या व्यक्ती आहेत तर सहा जणांना मरणोत्तर हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्म पुरस्कारांसाठी यंदा केंद्राकडे १८ हजार शिफारसी आल्या होत्या. त्यापैकी चार हजार शिफारसी ऑनलाइन दाखल करण्यात आल्या होत्या.

यांना पुरस्कार..

पद्मविभूषण

शरद पवार, मुरली मनोहर जोशी, येसुदास, जग्गी वासुदेव, प्रा. उडिपी रामचंद्र राव, सुंदरलाल पटवा (मरणोत्तर), पी. ए. संगमा (मरणोत्तर)

पद्मभूषण

विश्वमोहन भट्ट, प्रा. डॉ. देविप्रसाद द्विवेदी, तेहेम्टन उदवाडिया, रत्नसुंदर महाराज, राणी महाचक्री सिरिनधोन (विदेशी व्यक्ती), चो रामस्वामी (मरणोत्तर)

पद्मश्री

अप्पा धर्माधिकारी, निवेदिता भिडे, डॉ. मापुस्कर (मरणोत्तर), विराट कोहली, दीपा कर्माकर, साक्षी मलिक, दीपा मलिक, मरिअप्पन थंगवेलु, पी. श्रीजेश, संजीव कपूर, मदन माधव गोडबोले

 

 

लक्ष्यभेदाचा शौर्यगौरव

नवी दिल्ली : उरी हल्ल्याचा निषेध म्हणून सप्टेंबरमध्ये  पाकिस्तानात शिरून धाडसी ‘लक्ष्यभेदी’ कारवाई करणाऱ्या लष्कराच्या विशेष दलातील १९ धाडसी जवानांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एका कीर्तीचक्रासह विविध शौर्यपदके जाहीर करण्यात आली. तसेच त्यांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांना युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या एका चमूचे नेतृत्व करणारे ४ पॅराचे मेजर रोहितसुरी यांना कीर्तीचक्र जाहीर करण्यात आले आहे. शांततेच्या काळात दिला जाणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा शौर्यपुरस्कार आहे. गोरखा रायफल्सचे हवालदार प्रेम बहादूर रेस्मी मगर यांना मरणोत्तर कीर्तीचक्र देण्यात आले आहे. ९ पॅराचे कमांडिंग अधिकारी कर्नल कपिल यादव आणि ४ पॅराचे कमांडिंग अधिकारी कर्नल हरप्रीत संधू यांना युद्ध सेवा पदक देण्यात येणार आहे. युद्ध, चकमक किंवा शत्रूशी संघर्ष यासह युद्धकाळातील मोहिमेत विशिष्ट सेवा बजावणाऱ्या सैनिकांना भारताचे हे लष्करी सन्मानचिन्ह दिले जाते. युद्ध सेवा पदक हे शांततेच्या काळात दिल्या जाणाऱ्या विशिष्ट सेवा पदकाच्या समकक्ष आहे. २ पॅरा युनिटमधील पाच जणांना शौर्यचक्र, तर १३ जणांना सेना पदक देण्यात येणार आहे.