शरद पवार यांची शेलक्या शब्दांत टीका
नरेंद्र मोदींच्या घरात कोणी नाही, जे आहेत, ते कुठे याचा पत्ता लागत नाही. कधीतरी फोटो पाहायला मिळतो. आता ते दुसऱ्याच्या घराची चौकशी करतात. मोदींना कुटुंबाचा अनुभवच नाही, अशा शेलक्या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी गांधी, पवार कुटुंबीयांवर हल्ले केले जात आहेत, असेही ते म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या वतीने पुण्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.
भारतीय जनता पक्षाचा पराभव हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे आवाहन करत पवार म्हणाले, मोदींच्या राजवटीत शेतकरी उद्ध्वस्त झाला असून संवेदनाहीन राज्यकर्त्यांना बदलण्याशिवाय गत्यंतर नाही. सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्यांच्या जिवाची किंमत नाही. नोटाबंदीच्या रांगेत शंभरजणांचे जीव गेले, १३ लाख रोजगार उद्?ध्वस्त झाले. जिल्हा सहकारी बँकांना छळले. पुणे जिल्ह्य़ात एकही नवा कारखाना आलेला नाही. रिझव्र्ह बँकेच्या, न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप केला जातो, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुखाला हाकलले जाते. त्यामुळे लोकशाही संस्थांच्या प्रतिष्ठा आणि सार्वभौमत्वावर सरकारचा विश्वास राहिलेला नाही. उलट भाजप नेते राज्यघटना बदलण्याची भाषा करतात.
राजकीय फायदा : जिनिव्हा करारामुळेच पाकिस्तानच्या ताब्यातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेऊ नका, असे आवाहन केले होते. मात्र, तरीही ५६ इंच छातीची भाषा मोदी सरकार करत आहे. मग कुलभूषण जाधव दोन वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात असताना त्याला सोडवण्यासाठी सरकारने काय केले? तेव्हा कुठे गेली ५६ इंचांची छाती? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.