Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीने २३७ जागा जिंकल्या आहेत. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले नेते हे एकनाथ शिंदेंकडे येतील अशा चर्चा रंगल्या. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन सोडून हातात धनुष्यबाण घेतला. या सगळ्या पार्श्वभूमीवर लवकरच ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होतील अशी चर्चा रंगली आहे. याबाबत आज शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे. तसंच नीलम गोऱ्हे यांनी जे वक्तव्य साहित्य संमेलनात केलं ते मूर्खपणाचं आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हेंबाबत काय म्हणाले शरद पवार?

नीलम गोऱ्हे यांनी जे भाष्य साहित्य संमेलनात केलं त्याची काही आवश्यकता नव्हती. नीलम गोऱ्हे यांना चारवेळा आमदारकी मिळाली आहे. त्यांना या चारही टर्म कशा मिळाल्या या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी मला वाटतं कुठल्याश्या कारचा उल्लेख केला तो करायला नको होता. नीलम गोऱ्हे यांनी असं बोलायला नको होतं. नीलम गोऱ्हे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होत्या. त्यानंतर त्या शिवसेनेत होत्या, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्या काम करत होत्या. त्यानंतर आता हल्ली त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. एका मर्यादित कालावधीत त्या जवळपास चार पक्षांचा अनुभव त्यांनी घेतला आहे. नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं. यापेक्षा जास्त मी काहीही बोलणार नाही. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांना ऑपरेशन टायगर बाबत विचारण्यात आलं. त्यावरही शरद पवारांनी उत्तर दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत शरद पवार काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंची साथ सोडून खासदार एकनाथ शिंदेंबरोबर जातील का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, याबाबत मला माहिती नाही, पण माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष या सर्व खासदारांची बैठक होती. आम्ही दोन तीन तास चर्चा केली. त्यात कुणाच्याही मनात फुटण्याचा विचार नाही. उद्धव ठाकरेंचे लोक त्यांच्यासोबत एका विचाराने आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान ‘हलके में मत लो’ असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘हलके में मत लेलो हे काय प्रकरण आहे. मला मराठी जेवढं कळतंय त्यात हा शब्द नाही’ असं त्यांनी म्हटलं आहे.