विरोधकांकडून संयुक्त उमेदवार देण्याबाबत चर्चा; मोट बांधण्याचे विरोधकांचे प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नसल्याचे वारंवार स्पष्ट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी सायंकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी गुफ्तगू केले. या भेटीबाबत खात्रीशीर तपशील मिळाला नसला तरी ही भेट राष्ट्रपतिपदासाठी सगळ्या विरोधकांकडून एकच उमेदवार उभे करण्याबाबत असल्याचे समजते.

फक्त चौदा खासदारांच्या बळावर राष्ट्रपतिपदाची स्वप्ने पाहत नसल्याचे सांगत पवारांनी निवडणूक लढविणार नसल्याचे नुकतेच सोलापूर येथे स्पष्ट केले होते. मात्र, त्याचवेळी ‘सहमती’च्या उमेदवाराचीही भलामण केली होती. या पाश्र्वभूमीवर ते सोनियांना भेटले. यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, संयुक्त जनता दलाचे नेते आणि शर्यतीतील एक नाव शरद यादव यांनीही गेल्या काही दिवसांमध्ये सोनियांशी स्वतंत्रपणे चर्चा केलेली आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. आपला उमेदवार ‘रायसिना हिल्स’वर पाठविण्यासाठी भाजपला पंधरा ते वीस हजार मतांची आवश्यकता आहे. त्यासाठी अण्णाद्रमुक (सुमारे ५८ हजार मते), बिजू जनता दल (सुमारे ३३ हजार मते), तेलंगणा राष्ट्र समिती (सुमारे २२ हजार), वायएसआर काँग्रेस (१७ हजार) आदी पक्षांवर भाजपचा डोळा आहे. यापैकी एखादा जरी पक्ष भाजपच्या गळाला लागला तरी निवडणूक सहजपणे जिंकता येईल, असे सध्याचे चित्र आहे.

प्राथमिक आकडेवारीनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे सुमारे ४९ टक्के मते, विरोधकांकडे (संयुक्त पुरोगामी आघाडी) ३६ टक्के आणि कुंपणावरील सहा पक्षांकडे सुमारे १४ टक्के मते आहेत. सर्व विरोधकांमार्फत एखादा तगडा उमेदवार दिल्यास आणि कुंपणावरील पक्षांना स्वत:च्या बाजूने वळविल्यास मोदींच्या उमेदवाराची चांगलीच दमछाक होऊ  शकते, असा अंदाज विरोधकांतील काही धुरीणांना आहे. तसेच शिवसेनेने ऐनवेळेला इंगा दाखविल्यास आणखी पंचवीस हजार मतांची गरज भाजपला लागू शकते. गोंधळाचे वातावरण असलेल्या अण्णाद्रमुकची कोणतीही खात्री नाही. भाजपने ओडिशावर लक्ष केंद्रित केल्याने बिजू जनता दल विरोधकांना येऊन मिळण्याची चिन्हे आहेत. ही सगळी गणिते लक्षात घेऊन विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न चालू आहेत. भाजपला सर्वत्र मिळत असलेल्या घवघवीत यशाने विरोधक धास्तावलेले आहेत. एकत्र आला नाही तर दिल्लीसारखेच निकाल लागत राहतील,असा निर्वाणीचा इशारा लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे.

एकीच्या प्रयत्नांपासून राहुल गांधी दूर

विशेष म्हणजे विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुन्हा सोनिया गांधींना सRिय व्हावे लागले आहे. या एकीच्या प्रयत्नांपासून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना जवळपास बाजूला ठेवल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यास्तव सोनियांनी दैनंदिन बाबी राहुल यांच्यावर सोपविल्या आहेत. नुकत्याच त्या उपचारांसाठी परदेशात गेल्या होत्या. मात्र, राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने त्या चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आणखी विरोधी नेते सोनियांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar sonia gandhi president of india
First published on: 27-04-2017 at 02:12 IST