Justice Partha Sarathi Chatterjee Death Threats over Sharmishta Panoli Case : पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठा पनोली नावाच्या विद्यार्थिनीला ३० मेच्या रात्री कोलकाता पोलिसांनी हरियाणाच्या गुरुग्राम येथून अटक केली. शर्मिष्ठावर ‘ऑपरेशन सिंदूर’वरील पोस्टला उत्तर देताना आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत या विद्यार्थिनीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामुळे मोठा वाद पेटला असून याप्रकरणी न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळत तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शर्मिष्ठाला जामीन नाकारणारे न्यायाधीश पार्थ सारथी चॅटर्जी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत .
शर्मिष्ठा पनोली ही एक सोशल मीडिया एन्फ्लुअन्सर असून तिच्या व्हिडीओमध्ये ती बहुतांश वेळा कठोर भाषेचा वापर करते. तिने अलीकडेच ऑपरेशन सिंदूरबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओद्वारे तिने जातीय तणाव निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. याप्रकरणी तिच्याविरोधात खटला दाखल केल्यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, या निर्णयामुळे न्यायाधीश पार्थ सारथी चॅटर्जी यांना काही लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अनेक बनावट व अनोळखी सोशल मीडिया अकाउंट्सवरून चॅटर्जी यांना धमक्या देणाऱ्या, त्यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. यामध्ये चॅटर्जी यांच्याबद्दल अभद्र व आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात आहेत.
न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी
एका युजरने पोस्ट केली आहे की न्यायमूर्ती “पार्थ सारथी चॅटर्जी यांना पोत्यात घालून मारलं पाहिजे”, “हिंदूंना आता अज्ञात बंदूकधाऱ्यांची आवश्यकता आहे”. तर, आणखी एका युजरने थेट “Kill Partha Sarathi Chatterjee” अशी पोस्ट केली आहे.
बनावट अकाउंट्सवरून धमक्या
दरम्यान, फॅक्ट चेक केल्यानंतर लक्षात आलं की या अशा पोस्ट केलेले सोशल मीडिया अकाउंट्स बोगस व बनावट आहेत. यापैकी अनेक अकाउंट्सचे प्रोफाइल फोटो म्हणून खेळाडू, बॉलिवूड सेलिब्रेटी व धार्मिक प्रतीकांचे फोटो वापरण्यात आले आहेत. यापैकी काही अकाउंट्स मे महिन्यात बनवण्यात आले आहेत. काही अकाउंट्सद्वारे न्यायमूर्ती पार्थ सारथी यांचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, काहींनी न्यायमूर्तींचा फोन नंबर मागितला आहे. काही युजर्सने इतरांना हिंसेसाठी प्रेरित करणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत. काही युजर्सने न्यायमूर्ती व पश्चिम बंगाल सरकारला धमक्या दिल्या आहेत. त्या आशयाचे व्हिडीओ देखील पोस्ट केले आहेत.
शर्मिष्ठाने ‘तो’ व्हिडीओ हटवला
न्यायमूर्ती पार्थ सारथी यांनी शर्मिष्ठाचा जामीन फेटाळताना म्हटलं होतं की तिचा व्हिडीओ अनेकांनी पाहिला व ऐकला आहे. या व्हिडीओमुळे समाजातील एका वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दरम्यान, शर्मिष्ठा पनोली हिने तिचा व्हिडीओ समाजमाध्यमांवरून हटवला आहे. त्यावेळी तिने माफी देखील मागितली होती.