Shashi Tharoor Post : ऑ परेशन सिंदूरची माहिती जगातल्या देशांना देण्यासाठी मोदी सरकारने सर्वपक्षीय खासदारांचं एक पथक विविध देशांच्या भेटीवर पाठवलं आहे. या मध्ये शशी थरुर यांचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या कुरापती कशा पद्धतीने होत आहेत? भारताने त्यांना कसं उत्तर दिलं? याबाबत हे खासदार विविध देशातल्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहेत. दरम्यान शशी थरुर यांनी पनामामध्ये गेल्यानंतरची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
शशी थरुर यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
सर्व पक्षीय खासदारांच्या प्रतिनिधी मंडळाने पनामातल्या इंडियन कल्चरल सेंटरला भेट दिली. या ठिकाणी एक खूप सुंदर मंदिरही पाहता आलं. आमच्यासह आमचे सहकारी खासदार सरफराज अहमदही होते. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही मंदिरात कसे काय? त्यावर त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. “जब बुलाने वालो को कोई ऐतराज नही तो जाने वालो को ऐतराज क्यूँ होगा?” अशी पोस्ट शशी थरुर यांनी केली आहे.
सर्वपक्षीय शिष्टमंडळ विदेश दौऱ्यावर
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आणि भारतामधील शस्त्रविरामानंतर पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवले. त्यातील एका शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचादेखील समावेश आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेत गेले होते. अमेरिकेत त्यांनी प्रभावीपणे भारताची बाजू मांडली.
थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात कोणाचा समावेश?
शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळात शांभवी चौधरी (लोक जनशक्ती पार्टी), सरफराज अहमद (झारखंड मुक्ती मोर्चा), जीएम हरीश बालयागी (तेलगू देसम पार्टी), भाजपाचे शशांक मणी त्रिपाठी, तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर के. लता, मल्लिकार्जुन देवदा (शिवसेना) आणि अमेरिकेतील माजी भारतीय राजदूत तरणजित सिंग संधू यांचा समावेश आहे. काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ निरपराध भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर ६ आणि ७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानचा काही भाग यामध्ये एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानला जे चोख उत्तर दिलं त्याबाबतची माहिती विविधा देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं प्रतिनिधी मंडळ विविध देशांना भेटी देतं आहे. याच दरम्यान आता त्यांची पनामा येथील पोस्ट समोर आली आहे.