Shashi Tharoor on Vice President: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. भाजपाकडून अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. विरोधकांनीही उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांना उपराष्ट्रपतीपदाबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांच्य विधानाची माध्यमांतून चर्चा होत आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने यासंबंधीचा व्हिडीओ शेअर केला आहे. शशी थरूर हे गेल्या काही काळापासून भाजपाच्या जवळ गेल्याचे चित्र आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी अनेक देशांमध्ये सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले होते. या शिष्टमंडळाचे अध्यक्ष शशी थरूर होते. काँग्रेस पक्षही शशी थरूर यांच्या भूमिकांपासून अंतर राखत असल्याचे दिसून आले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शशी थरूर यांनी उपराष्ट्रपतीबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना शशी थरूर म्हणाले, “उपराष्ट्रपती कोण असेल याची मला कल्पना नाही. सत्ताधारी भाजपा पक्षाचा उमेदवार पुढचा उपराष्ट्रपती असू शकतो. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेचे दोन्ही सभागृह आणि राज्य विधिमंडळातूनही मतदान होते. याउलट लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात. त्यामुळे या दोन सभागृहात कुणाचे बहुमत आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पुढचा उपराष्ट्रपती असेल, हे दिसते.”
पुढील उपराष्ट्रपती ठरविण्यासाठी केंद्र सरकार विरोधी पक्षांशी सल्लामसलत करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कधी होणार निवडणूक?
उपराष्ट्रपतीपदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होईल. ७ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले. उमेदवारी अर्जाचे नामांकन करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट असेल. मतदानाच्या दिवशीच निवडणुकीचा निकाल लागेल.
संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात. सध्या दोन्ही सभागृहाचे एकत्रित संख्याबळ ७८२ आहे. सर्व सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यास विजयी उमेदवाराला ३९१ मतांची आवश्यकता भासेल. लोकसभेत एनडीएकडे ५४२ पैकी २९४ सदस्यांचा आणि राज्यसभेत २४० पैकी १२९ सदस्यांचा पाठिंबा आहे. एकूण ४२२ सदस्य सत्ताधारी एनडीएकडे आहेत.