Sheikh Hasina : बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे गृह व्यवहार सल्लागार ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम. शखावत हुसैन यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पुन्हा मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. परंतु, मायदेशात आल्यानंतर कोलाहल निर्माण न करण्याची सूचना त्यांना दिलीय.

माध्यमांशी बोलताना हुसेन म्हणाले, तुम्ही स्वेच्छेने गेलात. तुम्ही पुन्हा तुमच्या देशत परत येऊ शकता. पण कोणताही गोंधळ माजवू नका. कारण लोक आणखी चिडतील. तुम्ही परत यावं. पण देशाला अराजकतेत ढकलू नका. नवीन चेहऱ्यांसह तुमचा पक्ष पुन्हा उभा करा”, असा सल्लाही त्यांनी शेख हसीना (Sheikh Hasina) यांना दिला. यासंदर्भातल दि बिझनेस स्टँण्डर्डने वृत्त दिलं आहे.

बांगलादेशमध्ये अराजकता माजली आहे. देशभर गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार होत आहे. अशातच आता धार्मिक कट्टरतावादी बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करू लागले आहेत. हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांची त्यांची घरं पेटवली जात आहेत, मंदिरांची नासधुस-तोडफोड होत आहे. त्यानंतर अल्पसंख्याक हिंदूंनी देखील आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, बांगलादेशमधील हंगामी सरकारमधील गृह विभागाचे सल्लागार शखावत हुसैन यांनी मान्य केलं आहे की त्यांच्या देशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना सुरक्षा पुरवण्यात बांगलादेशी सरकार व सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली आहे.

हेही वाचा >> Bangladesh Crisis : “आम्ही अपयशी ठरलो”, बांगलादेशमधील सरकारने मागितली हिंदूंची माफी, शेख हसीनांच्या पक्षाला इशारा देत म्हणाले…

अंतरिम सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

बांगलादेशमधील नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून शपथ घेतली आहे. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी आंदोलक करत होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मी सरकारचा सल्लागार म्हणून काम करेन, अशी ग्वाही मोहम्मद युनूस यांनी दिली होती. त्यानुसार ते बांगलादेशला परतले व त्यांनी देशाची कमान आपल्या हातात घेतली आहे. बांगलादेशमधील लष्कराने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतला असला तरीही त्यांना देशात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेक आघाड्यांवरील आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बांगलादेशमध्ये चालू असलेला हिंसाचार ते किंवा बांगलादेशी लष्कर थांबवू शकलेलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थी आंदोलनाच्या रोषामुळे शेख हसीना यांना त्यांचा देश सोडावा लागला. पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन त्यांनी थेट सुरक्षित आश्रयासाठी भारत गाठले होते. त्या युकेसह इतर देशात आश्रय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, इतर देशातील त्यांचा प्रवास लांबल्याने त्यांचा भारतातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचं मंत्रिमंडळही बरखास्त झाले. परिणामी नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांनी काळजीवाहू सरकारचे नेतृत्व स्वीकारले आहे. युनूस यांना राज्याचा कारभार चालवण्यासाठी मदत करण्याकरता १६ सदस्यी सल्लागारांची परिषदही जाहीर करण्यात आली आहे.