दुबईमधील अल मिन्हाद जिल्ह्याचे नाव आता 'हिंद सिटी'; नाव बदलणारे शेख मोहम्मद बिन रशीद कोण आहेत? | Sheikh Mohammed renames Al Minhad area as Hind City in Dubai | Loksatta

दुबईमधील अल मिन्हाद जिल्ह्याचे नाव आता ‘हिंद सिटी’; नाव बदलणारे शेख मोहम्मद बिन रशीद कोण आहेत?

दुबईमधील अल मिन्हाद जिल्ह्याचे नाव बदलून हिंद सिटी असे नाव ठेवण्यात आले आह.

al minhad now hind city
उपराष्ट्रपती व पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम

दुबईमधील अल मिन्हाद जिल्हा आणि आसपासच्या परिसराचे नाव बदलून आता हिंद सिटी असे नवे नाव देण्यात आल्याची घोषणा उपराष्ट्रपती व पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी केली. युएईची वृत्त संस्था डब्लूएएम यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. अल मिन्हाद जिल्ह्या चार सेक्टरमध्ये विभागला गेलेला आहे. याला अनुक्रमे हिंद १, हिंद २, हिंद ३ आणि हिंद ४ अशी नावे देण्यात आली आहेत. हिंद सिटी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८३.९ किमी पर्यंत पसरलेले आहे. तसेच हे शहर अमीरात रोड, दुबई अल ऐन रोड आणि जेबेल अली लेहबाब रोड सारख्या प्रमुख महामार्गांनी जोडलेले आहे.

दुबईमध्ये शहराचे किंवा एखाद्या स्थळाचे नाव बदलण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील २०१० मध्ये दुबईची जगप्रसिद्ध इमारत बुर्ज दुबईचे नाव बदलण्यात आले होते. अबू धाबीचे शासक आणि संयुक्त अरब अमीरातचे माजी राष्ट्रपती शेख खलीफा बिन जायद अल नाहयान यांच्या नावाने बुर्ज दुबईच्या इमारतीला बुर्ज खलीफा असे नाव दिले होते. १३ मे २०२२ रोजी शेख खलीफा यांचे निधन झालेले आहे.

हिंद सिटी असे नाव देणारे शेख बिन रशीद कोण आहेत?

शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम, यांनी अल मिन्हाद जिल्ह्याचे नाव बदलून हिंद सिटी असे ठेवले. संयुक्त अरब अमीरातचे उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि सरंक्षण मंत्री यासोबतच ते राजे देखील आहेत. ते माजी उपराष्ट्रपती आणि दुबईचे राजे शेख रशीद बिन ‘सईद’ अल मकतूम यांचे तिसरे पूत्र आहेत. २००६ साली त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर शेख मोहम्मद बिन रशीद यांनी उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला. जगातील प्रमुख बांधकाम व्यवसायिकांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे.

हिंद शब्दाचा अरेबिक अर्थ माहितीये का?

हिंद सिटी असे नामकरण केल्यानंतर दुबईमधील हिंदूचा एकप्रकारे हा बहुमान असल्याच्या प्रतिक्रिया काही इंटरनेट युजर्सनी व्यक्त केल्या आहेत. मात्र युएई प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत अशी घोषणा केलेली नाही. हिंद हा शब्द अरेबिक भाषेत देखील आहे. त्याचा अरेबिक अर्थ होतो १० उंटांचा कळप. तसेच अरबस्तानात हिंद असे मुलींचे नाव देखील आहे. उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांच्या बायकोचे नाव देखील हिंद असे आहे. त्यांचे पूर्ण नाव “शेख हिंद बिंत मकतूम बिन जुमा अल मकतूम” असे आहे.

उपराष्ट्रपती व पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या पत्नी शेख हिंद बिंत मकतूम बिन जुमा अल मकतूम

याचा अर्थ त्यांच्या बायकोचे नाव अल मिन्हाद जिल्ह्याला दिले असे नाही. युएई प्रशासनाने जिल्ह्याचे नाव बदलण्याचे कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 10:57 IST
Next Story
“मला पंतप्रधान बनवलं तरी BJP-RSS सोबत युती करणार नाही”, कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपावर हल्लाबोल