दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्याची संधी दिली पाहिजे, असे सांगत कॉंग्रेस नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी भाजपचे गुरुवारी समर्थन केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच कॉंग्रेसने ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगत स्वतःला त्यापासून दूर ठेवले.
शीला दीक्षित म्हणाल्या, लोकशाहीमध्ये निवडून आलेले सरकार कधीही चांगले असते. कारण ते सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करीत असते. जर भाजप दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करू शकत असेल, तर ते दिल्लीकरांच्या फायद्याचेच आहे.
काही दिवसांपूर्वीच शीला दीक्षित यांनी केरळच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्या पुन्हा राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीत सत्ता स्थापण्यासाठी भाजपला संधी दिली पाहिजे, असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. दिल्लीत सत्ता स्थापण्यासाठी भाजप घोडेबाजार करीत असल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसने केला आहे.