सैन्यातील कर्नलने लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत मॉडेलिंग क्षेत्रात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत कर्नलने पीडित मुलीला भेटायला बोलावले आणि दारु पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिमला पोलिसांनी आरोपी कर्नलला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित तरुणी ही २१ वर्षांची असून तिचे वडील शिमला येथील सैन्याच्या प्रशिक्षण केंद्रात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहेत. तर आरोपी कर्नल देखील याच प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत. १९ नोव्हेंबर रोजी कर्नल पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सहकारी लेफ्टनंट कर्नल आणि त्यांच्या मुलीला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. तुमच्या मुलीला मॉडेलिंगसाठी मुंबईत पाठवा, माझ्या ओळखीने तिला काम मिळवून देऊ, असे त्याने लेफ्टनंट कर्नलला सांगितले.

दुसऱ्या दिवशी कर्नलने पीडितेला व्हॉट्स अॅपवर फोटो पाठवायला सांगितले. मुंबईत राहणाऱ्या माझ्या मुलीला तुझे फोटो फॉरवर्ड करतो असे त्याने पीडितेला सांगितले होते. फोटो पाठवल्यानंतर कर्नलने पीडितेला फोन केला आणि भेटीसाठी घरी बोलावले. मॉडलिंग क्षेत्रातील काही मंडळींशी ओळख करुन देतो, असे त्यांनी पीडितेला सांगितले. पीडित तरुणी कर्नलच्या घरी पोहोचल्यावर कर्नलने तिला दारु पाजली आणि यानंतर तिच्यावर बलात्कार केला. कर्नलसोबत आणखी एक व्यक्ती तिथे उपस्थित होती, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांचे करिअर उद्ध्वस्त करु, अशी धमकी कर्नलने दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

मंगळवारी पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असून आरोपी कर्नलला अटक करण्यात आली आहे. तर कर्नलच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. या गुन्ह्यातील कर्नलचा साथीदार कोण होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सामूहिक बलात्कार आणि धमकी देणे या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सैन्यात खळबळ उडाली असून, अद्याप सैन्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shimla army colonel arrested for allegedly raping daughter of lieutenant colonel army training command
First published on: 23-11-2017 at 11:47 IST